Horse mounted police unit for Mumbai after 88 years will start patrolling from 26th january | तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलीस घोड्यावर दिसणार; पेट्रोलिंगची जबाबदारी सांभाळणार

तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलीस घोड्यावर दिसणार; पेट्रोलिंगची जबाबदारी सांभाळणार

मुंबई : ब्रिटिश काळात मर्यादित लोकसंख्या असताना त्यांच्या जिवीत व मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळलेल्या पोलिसांचा अश्वदल आता पुन्हा एकदा महानगरात पहावयास मिळणार आहे. ३० अश्व आणि त्यावर स्वार वर्दीधारी सिमेंटच्या रस्त्यावर दौड करणार आहेत. एकेकाळी मुंबईची शान राहिलेल्या अश्वदलाचा तब्बल ८८ वर्षाच्या खंडानंतर पुन्हा त्यांच्या नाळेचा आवाज खडखडणार आहे.

मुंबई पोलीस दलात येत्या २६ जानेवारीपासून अश्वदल पुन्हा कार्यरत केले जाणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वाराचे प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी दिली.

सशस्त्र विभागाच्या (एलए)च्या अखत्यारित अश्वदलाची जबाबदारी राहणार आहे. मोर्चे, आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. त्याचबरोबर रात्रगस्त व पेट्रोलिंग करण्याचे कामही या दलाकडून करुन घेण्यात येणार आहे.

अश्वदलातील कुमूक
पोलिसांच्या अश्वदलामध्ये ३० घोडे असणार असून प्रत्येकी एक फौजदार व सहाय्यक फौजदार असतील. तर ४ हवालदार व ३२ कॉन्स्टेबलचा समावेश असणार आहे. फौजदाराकडून या दलाच्या समन्वयाची जबाबदारी सांभाळली जाणार आहे.

ब्रिटिश काळात महानगरात लोकसंख्या व वाहनांची संख्या खूपच मर्यादित होती. त्यावेळी पोलीस वाहतुकीसाठी घोड्याचा वापर करीत होते. मात्र १९३२ नंतर त्याचा वापर थांबविण्यात आला. आता आधुनिक साहित्यसामुग्री व साधनाची उपलब्धता असतानाही त्याचा वापर कितपत उपयुक्त ठरते की हौसेखातर अश्वदल कायम ठेवले जाते, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Horse mounted police unit for Mumbai after 88 years will start patrolling from 26th january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.