Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ऑनर्स विथ रिसर्च'च्या नियमावलीला मान्यता; मुंबई विद्यापीठाच्या ४ वर्षांच्या पदवीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:30 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात शिकविला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार आगामी शैक्षणिक वर्षापासून चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात शिकविला जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षासाठी ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च पदवीच्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाने महासार्कच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चौथे वर्ष सुरू करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा संशोधन केंद्र असणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांकडे पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात, त्यांना ४ वर्षीय ऑनर्स पदवी अभ्यासक्रम राबवता येईल. 

ज्या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासह संशोधन केंद्र आहे, त्यांना हा अभ्यासक्रम राबवता येणार आहे. विद्यापीठाच्या एमएससी नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाची प्रवेशाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ४ वर्षे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमएससी नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर दोन अनिवार्य अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील.

दोन पर्याय निवडण्याची मुभा

ऑनर्स पदवी : या पर्यायात विद्यार्थ्यांनी चार वर्षांत १६० ते १७६ क्रेडिट्स पूर्ण करणे आवश्यक आहे. चौथ्या वर्षात मुख्य विषयाचा सखोल अभ्यास केला जाईल.

ऑनर्स विथ रिसर्च: या पर्यायात विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य विषयात १२ क्रेडिट्सचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध पूर्ण करावा लागेल. हा प्रकल्प सातव्या आणि आठव्या सत्रात पूर्ण केला जाईल.

पदव्युत्तर पदवीचे केवळ एकच वर्ष : पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष हे ऑनर्स पदवीच्या चौथ्या वर्षाशी सुसंगत ठेवले आहे. त्यामुळे चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना पदव्युत्तर पदवीचे केवळ एकच वर्ष पूर्ण करावे लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai University Approves 'Honours with Research' Guidelines for 4-Year Degrees

Web Summary : Mumbai University's new four-year degree program includes 'Honours' and 'Honours with Research' options. Colleges need postgraduate courses or research centers to offer the fourth year. Students can choose between in-depth study or a research project. The postgraduate degree will only require one year after completing the four-year degree.
टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यापीठमहाविद्यालयशिक्षणशिक्षण क्षेत्र