झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांना मानद पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 10:03 AM2022-05-13T10:03:00+5:302022-05-13T10:03:15+5:30

प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

Honorary degrees to Zakir Hussain and Shashikant Garware | झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांना मानद पदवी

झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांना मानद पदवी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून जागतिक कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद एल.एल.डी. (डॉक्टर ऑफ लॉ) आणि प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांचा मानद डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) पदवी देऊन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
मान्यवरांचा मानद पदवीने सन्मान करणे अभिनंदनीय असून त्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी केले. डॉ. मुकुंद चोरघडे यांनाही डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) पदवी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, प्रा. सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील, कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही प्रतिभा दिलेली असते. या प्रतिभेला शिस्त, एकनिष्ठपणा व परिश्रमातून फुलवता येते, असे राज्यपाल म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अध्ययनास चालना देण्यात येत असून यानंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासह संगीत देखील शिकण्याची व्यवस्था असेल असे सांगून या धोरणाची अंमलबजावणी चांगली झाली तर विद्यापीठांमधून झाकीर हुसेन, शशिकांत गरवारे यांच्याप्रमाणे प्रतिभावंत विद्यार्थी निर्माण होतील, असे राज्यपालांनी सांगितले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशिकांत गरवारे उपस्थित राहू शकले नाही. त्यांची कन्या मोनिका गरवारे यांनी पदवीचा स्वीकार केला. या विशेष दीक्षान्त समारंभासाठी संगीत क्षेत्रातील शंकर महादेवन, पं. विभव नागेशकर, सत्यजित तळवलकर, राकेश चौरसिया, विजय घाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

इच्छाशक्ती असणे आवश्यक
     मुंबई विद्यापीठाकडून मिळालेल्या या सन्मानासाठी माझे शब्द निश्चितच कमी पडत आहेत. आतापर्यंतची माझी मेहनत आणि कठोर परिश्रम यांचे फलित म्हणजे ही विद्यापीठाची मानद पदवी आहे. 
     या पुरस्काराने पुन्हा एकदा मला समाजाच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी, त्यांच्या उपयोगी येण्यासाठी प्रेरणा दिली आहे. नवीन पिढीला हाच संदेश देऊ इच्छित आहे की तुमच्याकडे फक्त पैसे असून, चालत नाही तर तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी तुमच्यामध्ये इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे, अशा भावना शशिकांत गरवारे यांनी त्यांची कन्या मोनिका गरवारे यांच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

     मुंबई विद्यापीठातर्फे संगीत क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल मानद एलएलडी पदवीने सन्मानित होणारे झाकीर हुसेन हे पहिलेच कलावंत असल्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. तर सातत्य, संयम आणि चिकाटी या बळावर नवउद्योग विश्व निर्माण करणारे शशिकांत गरवारे यांना डी. लिट. पदवी देऊन सन्मान करणे हे भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.

सन्मान वडिलांना समर्पित
भारतातील सर्वाधिक जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाने दिलेली पदवी हा मोठा बहुमान असून हा सन्मान आपण आपले वडील व गुरु उस्ताद अल्लारखा यांना समर्पित करतो. जीवनात गुरु होण्याचा प्रयत्न न करता उत्तम शिष्य होऊन रहा असा सल्ला आपल्याला वडिलांनी दिला होता व तो आपण पाळत आहोत. आज अनेक उत्तमोत्तम संगीतकार असून आपण केवळ त्यापैकी एक आहोत.
 - झाकीर हुसेन, ज्येष्ठ तबलावादक

Web Title: Honorary degrees to Zakir Hussain and Shashikant Garware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.