देशात पहिल्यांदाच हाेणार मध महोत्सव, मुंबईत प्रयाेग; उद्योगाची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:49 AM2023-12-29T10:49:10+5:302023-12-29T10:50:43+5:30

मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव २०२४’ राज्यात आयोजित केला आहे. 

Honey Festival to be held for the first time in the country Prayog in Mumbai | देशात पहिल्यांदाच हाेणार मध महोत्सव, मुंबईत प्रयाेग; उद्योगाची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न

देशात पहिल्यांदाच हाेणार मध महोत्सव, मुंबईत प्रयाेग; उद्योगाची व्याप्ती वाढण्यासाठी प्रयत्न

मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी, या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव २०२४’ राज्यात आयोजित केला आहे. 

हा महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारी रोजी होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली. फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.  विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, नित्यानंद पाटील उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार 
असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. 

मधमाश्यांचे विष करणार आजारावर उपाय :

४५३९ मधपाळ

सद्य:स्थितीत राज्यात एक हजार ७९ गावांमध्ये ४ हजार ५३९ मधपाळ शेतकरी मधमाशांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. गेल्या वर्षी एक लाख ६० हजार लिटर मध उत्पादन झाले. त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होते, अशी माहिती साठे यांनी दिली.

मधमाश्या या त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करून त्याला जखमी करतात. मधमाश्यांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर मधमाश्यांचे विष हे दुर्धर आजारावरसुद्धा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. 

जतन, संवर्धन, संरक्षणावर परिसंवाद :

दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाश्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. 

महोत्सवात असेल ‘हे’ वैविध्य :

मधमाशी पालनातील उपउत्पादने म्हणजेच पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाश्यांचे विष इत्यादींची माहिती व विक्रीसाठी मधमाशी पालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

मध, मेण यापासून तयार केलेली उत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत.   त्यामुळे मधमाश्यांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Honey Festival to be held for the first time in the country Prayog in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई