Homelessness of Kandivli became Skywalk | कांदिवलीचा स्कायवॉक बनला बेघरांचा अड्डा
कांदिवलीचा स्कायवॉक बनला बेघरांचा अड्डा

मुंबई : कांदिवली पूर्वेकडील स्कायवॉक हा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बांधण्यात आला आहे. हा स्कायवॉक बेघरांचा अड्डा झाला आहे. फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले असून, स्कायवॉकवरून प्रवाशांना चालणेही अवघड झाले आहे.
दामूनगर, क्रांतिनगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, हनुमाननगर येथील नागरिक या स्कायवॉकचा वापर करतात. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत स्कायवॉकवरील सरकता जिना गेले कित्येक दिवस बंद आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना त्रास सहन करावा लागतो. प्रेमीयुगुल आणि इतर लोक तासन्तास बसलेले दिसतात. स्कायवॉकच्या दुतर्फा अस्वच्छता पसरली आहे. विजेचे दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर्स, हाय व्होल्टेज सब स्टेशन ट्रान्सफॉर्मर बसविले आहे. संपूर्ण स्कायवॉकला केबलचा विळखा बसलेला आहे. स्कायवॉकलगत भले मोठे जाहिरातीचे फलक लावण्यात आले असून, भविष्यात दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांनी केला आहे.

स्कायवॉकच्या लोखंडी भागाला गंज पकडत आहे. कांदिवली रेल्वे स्थानकालगत स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे प्रवाशांना चालणे मुश्कील झाले आहे. कांदिवली स्कायवॉकवरून दररोज गर्दीच्या वेळी हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. स्कायवॉक हा प्रवाशांना चालण्यासाठी बनविला आहे की इतर गैर कामांसाठी तयार केला आहे, हेच काही कळत नाही. स्कायवॉकला दोन सरकते जिने असून ते कधी कार्यरत तर कधी बंद असतात. काही दिवसांपूर्वी तरुणांना सरकत्या जिन्याच्या बटणासोबत छेडखानी करताना पाहिले होते, अशी प्रतिक्रिया प्रवासी रूपेश पतंगे यांनी दिली.


Web Title: Homelessness of Kandivli became Skywalk
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.