Join us  

आपण याकडे लक्ष घालावं, फायनान्स कंपन्यांच्या तगाद्याविरुद्ध गृहमंत्र्यांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 1:35 PM

लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते.

मुंबई - महिला बचत गटांनी आणि वाहनधारकांनी फायनान्स कंपन्याकडुन कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मात्र, मार्च मिहन्यापासुन कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागल्याने अनेक बचतगट डबघाईला आले आहेत. तर, वाहनचालकांचेही जगण्याचे वांदे झाले आहेत. तरीही, फायनान्स कंपन्याच्या कर्ज वसुली पथकाकडून बचत गटाच्या महलांच्या घरी जाऊन हप्ते वसुलीचा तगादा लावला जात आहे. महिलांना व कर्जधारकांना मानिसक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 

लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते. मात्र, तरीही खाजगी फायनान्स कंपन्या महिलांना त्रास देत कर्ज वसुलीचा तगादा करीत पठाणी वसुलीचा अवलंब करीत असल्याने महिलांचे जगणे कठीण झाले आहे. वसुली पथकाची दंडेलशाही सुरू आहे. या जाचाला कंटाळुन बचतगटांच्या महिला व वाहनधारकांमध्ये तीव्र संताप आहे. वाहनांचे हप्ते फेडीसाठीची मॉरिटोरियमची मुदत ३१ ऑगस्टला संपत आहे. ही मुदत वाढवून द्यावी, व्याज माफ करावे आदी मागण्यांसाठी राज्यातील वाहतुक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बॅका व कंपन्यांसमोर निदर्शने केली. मागण्या मान्य न झाल्यास दि. १० सप्टेंबर रोजी सर्व वाहने बँक व फायनान्स कंपन्यांमध्ये जमा करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. 

आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी ट्विट करुन गृहमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी केली आहे. ''कर्जाच्या हप्त्यासाठी सवलत देऊनही काही खासगी वित्तीय संस्था वसुलीचा तगादा लावतायेत. त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांकडून कर्जदारांना धमकावण्याचेही प्रकार होत असल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयी दहशत आहे. याबाबत गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब आपण दखल घ्यावी, ही विनंती.'', असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. 

लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिक वाहने मागील पाच महिन्यांहून अधिक काळ जागेवरच उभी आहेत. व्यवसाय नसल्याने वाहतुकदारांना बँका व फायनान्स कंपन्यांचे हप्ते फेडणेही कठीण झाले आहे. लॉकडाऊन कालावधीत केंद्र सरकारने हप्त्यांमधून दिलासा देण्यासाठी मॉरिटोरियमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे वाहतुकदारांची काही महिने हप्त्यांमधून सुटका झाली. हा कालावधी दि. ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. दि. १ सप्टेंबरपासून पुन्हा कर्जाचे हप्ते सुरू होणार आहेत.  

टॅग्स :रोहित पवारअनिल देशमुखबँक