Mumbai Rain Update: मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबई लोकलवरही याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून मध्ये रेल्वेची वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने सुरु आहे. अशातच मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने महपालिकेने सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील सर्व खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान खात्याने मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आणि खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला दिला आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेच्या आंबिवली शहाड स्थानकामध्ये तांत्रिक बिघाडामुळे लोकल ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सरकारी आणि खासगी कार्यालयांन सुट्टी जाहीर केली आहे