मुंबई :
होळीनिमित्त मुंबईत उत्साहाचे वातावरण असून, विविध समाजघटक पारंपारिक पद्धतीने हा सण सोमवारी साजरा करणार आहेत. शहर-उपनगरातील कोळीवाडे, गावठाणे, जुन्या वसाहती, अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही या सणाची विविध रूपे पाहायला मिळतात.
अनेक ठिकाणी लाकडे, गवत, शेणाच्या गोवऱ्या रचून त्याची पूजाअर्चा केली जाते. काही ठिकाणी सामाजिक संदेश देणाऱ्या होळ्याही उभारल्या जातात. सामूहिक सहभाग, नवस परंपरा, लोककला आणि पर्यावरणपूरक उपक्रम, यामुळे हा सण संस्कृती आणि एकोप्याचे दर्शन यानिमित्ताने घडते.
मालाड कोळीवाड्यात ज्येष्ठांच्या हस्ते दहन : मालाड परिसरातील कोळीवाड्यात गावातील ज्येष्ठांच्या हस्ते होळीचे दहन केले जाते. होळीच्या अग्नीला पवित्र मानून नवस बोलले जातात. अनेक कुटुंबे नवस फेडण्यासाठी येथे येतात.
चेंबूर गावठाण येथे सुख-समृद्धीसाठी परंपरा : चेंबूर गावठाणात पारंपारिक पद्धतीने होळीभोवती फेऱ्या मारून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. येथे सामूहिक आरती, प्रसाद वितरणाची परंपरा आहे.
वरळी गावात पारंपारिक बँडचे गुंजनार सूरवरळी गावात संस्कृती, एकोप्याची भावना आणि परंपरेचे दर्शन घडते. रामजी कोळी परिवारातर्फे पारंपारिक पद्धतीने होळी साजरी होते. येथील पारंपारिक कोळी बँडचे सूर, तसेच ढोल-ताशांच्या तालावर आणि पारंपारिक गीतांच्या नादात सणाला एक वेगळाच साज चढतो. मुख्य होळीच्या एक दिवस आधी वरळी कोळीवाडा येथे 'कोंबड होळी' साजरी करण्याची खास परंपरा आहे.
नातेवाईक - मित्रमंडळी एकत्र येतात. रामजी कोळी परिवाराच्या होळीतील एक विशेष आकर्षण म्हणजे महिलांची पारंपारिक मडकी फोडण्याची प्रथा. परिवारातील महिला डोक्यावर सुंदर, आकर्षक पद्धतीने सजवलेली मडकी घेऊन होळीभोवती फेरे मारतात. त्यानंतर ही मडकी होळीच्या अग्नीत फोडली जातात. वाईट विचार, चिंता, नकारात्मक गोष्टींचे दहन करून नव्या सुरुवातीचे स्वागत करण्याची ही परंपरा आहे.
भांडुप गावठाणामध्ये प्लास्टिकविरहित शिमगोत्सवभांडुप गावठाणात शिमगोत्सवापूर्वी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते. पर्यावरणपूरक होळीचा संदेश देत प्लास्टिकविरहित सण साजरा करण्यावर भर दिला जातो. मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.
खारदांडा येथे 'कोंभार' होळीची संस्कृती१. खारदांड्यात १४ होळ्यांचे दहन केले जाते. त्यापैकी १३ होळ्या या 'कोंभार होळी' म्हणून ओळखल्या जातात. लहान मुले आणि अविवाहित तरुणांच्या हस्ते त्याचे दहन केले जाते.
२. १४ वी होळी मात्र मानाची असते. मानकरी आपल्या घरातून मानाची ओटी, निशाणी आणि अग्नी वाजत-गाजत, पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणतात. नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी भाविक दूरवरून येथे येतात. ब्रिटिश काळापूर्वीपासून ही परंपरा सुरू आहे.
३. एकदा होळीत विहिरीचे पाणी काढण्याच्या रहाटातील लाकूड जाळल्याची घटना घडली. त्यानंतर ब्रिटिशांनी वारेनपाड्यातील होळीवर काही निर्बंध आणले. त्यामुळे खारदांडा आणि वारेनपाड्यात दोन दिवस आधी होळी पेटवली जाते.
४. वारेनपाडा, पाटीलपाडा, कोठपाडा, मधलापाडा, वेताळपाडा आणि दांडापाडा या सहा पाड्यांचा एकत्रित सहभाग या उत्सवात असतो, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक तुळशीराम गोविंद तांडेल यांनी दिली.
Web Summary : Mumbai is immersed in Holi celebrations! Koliwadas, villages, and societies celebrate with traditional fervor, featuring bonfires, prayers, folk art, and eco-friendly initiatives. Communities like Worli and Khar Danda showcase unique customs, fostering unity and cultural heritage.
Web Summary : मुंबई होली के रंग में डूबा! कोलीवाड़ा, गाँव और सोसायटियाँ पारंपरिक उत्साह, अलाव, प्रार्थना, लोक कला और पर्यावरण के अनुकूल पहल के साथ मनाते हैं। वर्ली और खार डांडा जैसे समुदाय अनूठी रीति-रिवाजों का प्रदर्शन करते हैं, एकता और सांस्कृतिक विरासत को बढ़ावा देते हैं।