Join us  

वीज बिलांची होळी; मुंबईसह राज्यभरात आंदोलन पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 6:23 PM

लॉकडाऊनच्या काळात महावितरण, अदानी, टाटा आणि बेस्ट यांच्याकडून आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात महावितरण, अदानी, टाटा आणि बेस्ट यांच्याकडून आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले. वीज ग्राहकांनी रोष व्यक्त केल्यानंतर ऊन्हाळ्यासह कोरोना आणि वर्क फॉर्म होमवर वाढीव बिलाचे खापर सरकारने फोडले. मात्र या व्यतीरिक्त विजेच्या दरात झालेल्या वाढीमुळे देखील वीज ग्राहकांना मोठा शॉक बसला. परिणामी या वाढीव वीज दरासोबत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात सोमवारी मुंबईसह राज्यभर वीज बिलांची होळी आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गेल्या ३ महिन्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी केली.

कोरोना महामारी आपत्तीमुळे आर्थिक संकटात असलेले व दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणारे राज्यातील सर्व गरीब व सर्वसामान्य घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ३ महिन्यांची वीज बिले माफ करण्यात यावी. या ग्राहकांच्या रकमेची भरपाई राज्य सरकारने कोविड पॅकेज वा अनुदान स्वरूपात करावी इत्यादी मागण्यांसाठी मुंबईतल्या भांडूपसह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, भिवंडी, भांडुप, मालेगाव, नाशिक , नागपूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम येथे वीज बिलांची होळी आंदोलन छेडण्यात आले होते. ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलातर्फे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांच्या नेतृत्वाखाली भांडुप पश्चिम, लाल बहादुर शास्त्री मार्गावरील महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. राज्यभरात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्वपक्षीय कृति समितीचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिली. शिवाय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत सरकारला निवेदने पाठविण्यात आली आहेत.

........................

का केले आंदोलन

- रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय या सर्वांचीच दमछाक झाली आहे.

- मोफत धान्य वगळता केंद्र वा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जनतेला झालेली नाही.

- मोदी सरकारने जाहीर केलेल्या तथाकथित २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून गरीबांच्या भाकरीवर चमच्याभर तेलही पडलेले नाही.

- भाडे भरता आले नाही, वीज बील भरता येत नाही, म्हणून आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.

- वीज कंपन्यांनी मागील तीन ते चार महिन्यांची वीज देयके ग्राहकांना पाठविली असून ती भरण्यासाठी तगादा लावला आहे.

- १ एप्रिलपासून लागू झालेल्या दरवाढी बाबतही लोकांच्या मनात नाराजी आहे.

- या पार्श्वभूमीवर दरमहा ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापराची सर्व घरगुती ग्राहकांची बीले माफ करण्यात यावीत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉकमुंबई