'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:23 IST2025-10-31T06:23:08+5:302025-10-31T06:23:19+5:30

आणखी एक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही

Holding elections while maintaining chaos is match fixing Raj Thackeray allegations | 'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक

'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक

मुंबई : निवडणुकीत कोण जिंकणार, हे ईव्हीएमच्या माध्यमातून आधीच फिक्स केले जाते. काही गोष्टी लपवून, मतदार याद्यांतील गोंधळ कायम ठेवून निवडणुका घेण्याचा विचार म्हणजेच मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी हॉटेल रंगशारदा येथील मेळाव्यात केला.

चांगल्या महाराष्ट्राच्या स्वप्नांची राखरांगोळी ईव्हीएम मशीन करणार असेल तर अशा निवडणुकीचा उपयोग काय? आणखी एक वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तरी काही फरक पडणार नाही. मतदार याद्यांमधील घोळ दूर केल्याशिवाय राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असेही राज म्हणाले.

आयआयटी-दिल्ली संस्थेतून शिक्षण घेतलेले राहुल मेहता यांनी ईव्हीएमची डमी मशीन बनवली आहे. 'ईव्हीएम हटाव सेने'चे अमित उपाध्याय आणि याशीत पटेल यांनी मेळाव्यात ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक दाखवले. तत्पूर्वी, राज यांनी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, नाटक असते पण आज जादूचे प्रयोग दाखवत आहे, असे सांगत मनसैनिकांची उत्सुकता ताणून धरली.

कशी होते मतचोरी ?

२०१७ पूर्वी व्हीव्हीपॅटवरील काचा पांढऱ्या होत्या आणि या काचांच्या मागे लागणारे दिवे १५ सेकंद कार्यरत असायचे. मात्र, जून २०१७नंतर यात बदल करण्यात आला. व्हीव्हीपॅटवर काळी काच लावण्यात आली आणि दिवे उजळण्याचा कालावधी ८ सेकंदावर आणण्यात आला. ईव्हीएममध्ये मत चोरी करण्यासाठी एक विशिष्ट प्रोग्रामिंग करण्यात आला. त्यानुसार सफरचंद हे चिन्ह असलेल्या उमेदवाराला विजयी करण्याचे प्रोग्रामिंग करण्यात आले. मतदारांनी इतर चिन्ह उदाहरणार्थ केळी, कलिंगड यांना दिलेली मते सफरचंदाला कशी गेली याचे सादरीकरण अमित उपाध्याय यांनी केले. काळ्या काचेसमोर उभ्या असलेल्या मतदाराला त्याने दिलेले मत केळी किंवा कलिंगडला दिल्याची पावती दिसते. त्यानंतर काळ्या काचेमागचा दिवा बंद होतो. मात्र, प्रत्यक्षात ती पावती खाली पडणार नाही, अशी प्रोग्रामिंग केल्याने ती पावती तिथेच अडकून राहते. दुसरा मतदार आल्यावर त्यानेही जर केळी वा कलिंगडला मत दिल्यास त्या मताच्या पावतीसह एक मत सफरचंदला मिळाल्याची पावती खाली पडते, अशा पद्धतीने केळीला दोन, कलिंगडला दोन आणि सफरचंदाला १ मत देऊनही प्रत्यक्ष मतमोजणी व मतपावतीच्या मोजणीत सफरचंदला ३ तर केळी, कलिंगड प्रत्येकी १ मत मिळाल्याचे सादरीकरणातून समोर आले.

दुसरा प्रकार म्हणजे ईव्हीएममध्ये एक विशिष्ट प्रकारचा लाईट सेन्सर लावण्यात आला असून जर मतदार ४ सेकंदात ईव्हीएम समोरून निघून गेला तर त्याने केळी किंवा कलिंगडला दिलेले मत परस्पर सफरचंदाला जाते आणि त्याच चिन्हाची मतपावती कशी छापली जाते याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मोर्चा दणदणीत व्हावा

सभांना गर्दी होते; पण मते मिळत नाहीत, या शंकेचे हे उत्तर आहे. मतचोरीमुळेच आपला पराभव होतो. १ नोव्हेंबरला निघणारा मोर्चा पाहून महाराष्ट्रात काय आग पेटलीय, हे दिल्लीला कळायला हवे. मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, असे आवाहन राज यांनी केले.


केळी, कलिंगडाला दिले मत, मिळाले सफरचंदला

'ईव्हीएम हटाव सेने'चे अमित उपाध्याय यांनी प्रात्यक्षिकावेळी केळी चिन्हाला २, कलिंगडाला २ आणि सफरचंद चिन्हाला १ मत दिले; पण प्रत्यक्षात ३ मते सफरचंद चिन्हाला मिळाली.

ईव्हीएममध्ये काळी काच आणि लाईट सेन्सरच्या मदतीने मतचोरी केली जाऊ शकते, असा दावा सादरीकरणाच्या माध्यमातून केला गेला.?

ईव्हीएमच्या प्रोग्राममध्ये बदल करता येतात. याला हॅकिंग नव्हे तर प्रोग्राम सेट करणे म्हणतात, असे त्यांनी सांगितले.

किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभाराल तर फोडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पर्यटन विभाग शिवनेरी, रायगड, राजगड येथे नमो पर्यटन केंद्र उभारणार आहे. जिथे फक्त शिवाजी महाराजांचे नाव असले पाहिजे तिथे ही केंद्रे उभी केल्यास फोडणार. मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? समोर दिसेल ते मिळाले पाहिजे. हे सगळे सत्तेतून येत आहे, अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

Web Title : राज ठाकरे का आरोप, ईवीएम से चुनाव में फिक्सिंग; प्रदर्शन किया।

Web Summary : राज ठाकरे ने ईवीएम पर फिक्सिंग का आरोप लगाया, चुनाव को 'मैच फिक्सिंग' कहा। मतदाता सूची में हेरफेर का दावा किया। प्रदर्शन में दिखाया गया कि ईवीएम प्रोग्रामिंग और लाइट सेंसर से वोट कैसे बदले जा सकते हैं। ठाकरे ने ईवीएम धोखाधड़ी के खिलाफ विरोध का आग्रह किया।

Web Title : Raj Thackeray alleges EVM match-fixing; demonstrates setting manipulation.

Web Summary : Raj Thackeray alleges EVMs are rigged, calling elections 'match-fixing.' He claims voter lists are manipulated. A demonstration showed how votes can be diverted to a specific candidate using EVM programming and light sensors. Thackeray urged support for a protest against EVM fraud.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.