झोपडपट्ट्यांमध्ये होणार एचआयव्हीची जनजागृती, पालिकेकडून ३ नवीन फिरती वाहने उपलब्ध
By सीमा महांगडे | Updated: March 12, 2024 20:07 IST2024-03-12T20:06:10+5:302024-03-12T20:07:00+5:30
Mumbai News: मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत मुंबई महानगरातील प्रामुख्याने झोपडपट्टी व जोखीम प्रवण ठिकाणी एचआयव्ही समूपदेशन व रक्तचाचणी तसेच जनजागृती करण्याकरिता ३ नव्या फिरत्या वाहनांचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कोंडिविटा अंधेरी स्थित समाज कल्याण केंद्र येथे करण्यात आले.

झोपडपट्ट्यांमध्ये होणार एचआयव्हीची जनजागृती, पालिकेकडून ३ नवीन फिरती वाहने उपलब्ध
- सीमा महांगडे
मुंबई - मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत मुंबई महानगरातील प्रामुख्याने झोपडपट्टी व जोखीम प्रवण ठिकाणी एचआयव्ही समूपदेशन व रक्तचाचणी तसेच जनजागृती करण्याकरिता ३ नव्या फिरत्या वाहनांचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कोंडिविटा अंधेरी स्थित समाज कल्याण केंद्र येथे करण्यात आले. या वाहनांचा उपयोग मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला एचआयव्ही / गुप्तरोग जनजागृती व चाचणी शिबिरे आयोजित करण्यासाठी होणार आहे.
मुंबईमध्ये एचआयव्ही / एड्सचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला मूलभूत सेवासुविधा देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिल्या आहेत. या अंतर्गत तीन नवीन फिरती वाहने उपलब्ध झाली आहेत. मूलभूत सेवा विभागा अंतर्गत पालिका, शासकीय रूग्णालये व प्रसूतिगृहात एकूण ५० एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडे नव्याने भर पडलेल्या आणखी तीन फिरत्या वाहनांमुळे वाहनांची एकूण संख्या आता सहा झाली आहे.
४६ हजार ९५८ चाचण्या
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेकडून दरमहा १०० पेक्षा अधिक एचआयव्ही / गुप्तरोग जनजागृती चाचणी शिबिरे आयोजित केली जातात. एचआयव्ही व गुप्तरोग चाचणी करण्यासाठी मुंबई व उपनगरामध्ये अशासकीय संस्थांमार्फत दररोज एचआयव्ही / एड्स तपासणी शिबिरे भरविण्यात येतात. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार ट्रक चालक, क्लिनर व स्थलांतरित कामगार या जोखीम प्रवण गटांकरिता एकूण ४६ हजार ९५८ इतक्या गुप्तरोग व एचआयव्हीच्या चाचण्या या फिरत्या वाहनांच्या माध्यमातून झालेल्या शिबिरांमार्फत करण्यात आल्या आहेत.