Join us  

मुंबईत बांधकाम क्षेत्राची ऐतिहासिक कामगिरी; १० दिवसांत ३ हजारांपेक्षा अधिक घरांची विक्री

By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 12:07 PM

कुलाबा, सायनसारख्या परिसराला खरेदीदारांची पसंती, माहितीये या ठिकाणी किती आहेत जमिनीचे दर?

ठळक मुद्दे१० दिवसांत मुंबईत घरांची विक्रमी विक्रीसायन, कुलाबासारख्या परिसराला ग्राहकांची पसंती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनेक क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. त्यातच सर्वाधिक फटका हा बांधकाम क्षेत्रालाही झाल्याचं सांगण्यात आलं होतं. या कालावधीत अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या किंवा रोजगारावर झालेल्या परिणामाचा फटका बांधकाम क्षेत्राला बसला होता. परंतु आता पुन्हा एकदा बांधकाम क्षेत्राला सोन्याचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात बांधकाम क्षेत्राला पुन्हा चालना मिळावी यासाठी काही नव्या उपाययोजना करण्यात आल्या. त्याचाच फायदा मुंबईतील बांधकाम क्षेत्राला झाला असून या क्षेत्रानं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गेल्या १० दिवसांच्या कालावधीत मुंबईत जवळपास ३ हजार ०९५ घरांची विक्री झाली असल्याची माहिती माहिती डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्पकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला होता. राज्य सरकारनं घरांवरील स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ग्राहकांना तसंच बांधकाम व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला होता. सरकारच्या त्या निर्णयानंतर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत तब्बल १९ हजार घरांची विक्री झाल्याची माहितीही समोर आली होती.मुंबईतील घरांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत असं म्हटलं जातं. तरी अनेकांनी गेल्या काही महिन्यात मुंबईत घर खरेदीला पसंती दिल्याचं दिसून आलं. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत केवळ मुंबईत ६ हजार ४३९ घरांची खरेदी करण्यात आली. राज्य सरकारला मिळालेल्या एकूण महसूलातही ४५ टक्के वाटा हा घरखरेदीचाच होता. सायन ते कुलाबा या परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी झाली. याव्यतिरिक्त खरेदीदारांनी कुर्ला आणि बोरीवलीसारख्या भागांनाही पसंती दिल्याचं दिसलं. कुलाब्यामध्ये जमिनीचे दर ५५ हजार रूपये ते १ लाख रूपये प्रति चौरस फूट इतके आहेत. तर सायन परिसरात ३० हजार ते ५० हजार रूपये प्रति चौरस फूट इतके झाले आहेत. 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगइतिहासकुलाबासायन कोळीवाडा