वर्तमानातील चित्रांवर त्यांचे असायचे लक्ष; अमोल पालेकर : ‘गायतोंडे - बिटवीन टू मिरर्स’चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:15 IST2025-02-28T08:12:41+5:302025-02-28T08:15:29+5:30
‘गायतोंडे : बिटवीन टू मिरर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा शानदार सोहळा फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडला.

वर्तमानातील चित्रांवर त्यांचे असायचे लक्ष; अमोल पालेकर : ‘गायतोंडे - बिटवीन टू मिरर्स’चे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतात अमूर्त कलेचा पाया रचणारे प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यावरील पुस्तकात लेखिका शांता गोखले यांनी गायतोंडे यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडले आहेत. प्रत्येक चित्र सेल्फ पोर्ट्रेट असते, असे गायतोंडे म्हणायचे. त्यामुळे ‘गायतोंडे : बिटवीन टू मिरर्स’ हे शीर्षक समर्पक आहे. त्यांना मी माझ्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील दिवसांपासून ओळखत होतो. त्यांचे कायम वर्तमानातील चित्रांवर लक्ष असायचे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते-चित्रकार अमोल पालेकर यांनी काढले. ‘गायतोंडे : बिटवीन टू मिरर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा शानदार सोहळा फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडला.
प्रकाशन साेहळ्यात मान्यवरांचा सत्कार
यावेळी पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, पद्मश्री डॉ. सरयू दोशी, ज्येष्ठ अभिनेते-चित्रकार अमोल पालेकर, डॉ. फिरोजा गोदरेज, प्रयाग शुक्ला, केतन करानी, मिलिंद हरडस, विनीत भुरके, लेखिका शांता गोखले, चिन्ह मासिकाचे संस्थापक सतीश नाईक, पद्मश्री कुमार केतकर, पुस्तकाचे कार्यकारी संपादक विनील बोरखे आणि सहायक संपादिका डॉ. मंजिरी ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मंजिरी ठाकूर यांनी पुस्तकाचा प्रकाशनापर्यंतचा प्रवास उलगडताना सतीश नाईक यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाबाबत सांगितले. संध्या गोखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्युत पालव, प्रभाकर कोलते, नरेंद्र आणि विद्या डेंगळे, नितीन दादरावला, नील दफ्तरदार यांचा सत्कार करण्यात आला.
भाषांतरकाराचे काम पडद्यामागचे असते. नातेवाइकांनी गायतोंडे यांच्याबद्दल जे लिहिले त्यातून त्यांची भावनिक बाजू उलगडली आणि पुस्तकासाठी मजकूर तयार होत गेला. हे पुस्तक भाषांतरित करण्यापूर्वीच मराठी पुस्तकाच्या प्रेमात पडले. आज एक सुंदर पुस्तक वाचकांच्या भेटीला आल्याचा आनंद होत आहे.
- शांता गोखले, लेखिका
शांता गोखले यांनी सुरेख इंग्रजी भाषांतर केल्याने गायतोंडे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वदूर पोहोचणार आहेत. गायतोंडे यांची देवनागरी आणि इंग्रजीतील स्वाक्षरी लक्षवेधक होती.
- डॉ. फिरोज गोदरेज