Join us  

Hinganghat Burn Case: ...त्यापेक्षा तुला 'निर्भया' नाव ठेवणं आम्हाला सोयीचं वाटतं; शालिनी ठाकरेंचं उपरोधिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 3:22 PM

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.

मुंबई - हिंगणघाट जळीत पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोपर्डी असो वा हिंगणघाट अशा घडणाऱ्या घटनांमधून महाराष्ट्रातील मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी ऐरणीवर येतो. घटना घडल्यानंतर प्रत्येक स्तरातून त्याचा निषेध नोंदवला जातो पण अशा घटनेतील आरोपींवर तातडीनं कारवाई झाल्याचं दिसत नाही. 

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर जरब बसावी असे कठोर कायदे करण्याची मागणी झाली. या घटनेला आता ८ वर्षाहून अधिक काळ लोटला मात्र आजही दिल्लीसारख्या अनेक निर्भया देशभरात असुरक्षित फिरत आहे. राज्यातील हिंगणघाट प्रकरणातून हे पुन्हा एकदा समोर आलं. एका तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं. त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर ७ दिवसानंतर अपयशी ठरली. आज सकाळी त्या पीडितेचा मृत्यू झाला. पुन्हा सगळेजण प्रतिक्रिया देऊ लागले. आरोपींवर कारवाईची मागणी होऊ लागली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उपरोधिक पत्र लिहिलं आहे. 

प्रिय निर्भया, 

कुणी तरी तुझ्यावर ऍसिड टाकतं, कुठेतरी तुझ्यावर बलात्कार होतो किंवा कधीतरी तुला रॉकेल टाकून पेटवून दिलं जातं... मग तुझं खरं नाव समाजाला समजू नये, तुझी ओळख उघड होऊन तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या वेदना आणखी वाढू नयेत, म्हणून आम्ही तुझं नामकरण करतो- 'निर्भया', जी कुणालाही घाबरत नाही, जिला कसलंही भय नाही ती 'निर्भया'!

महिलांना समान न्याय, समान संधी, समान वेतन आणि त्यातून महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने समान सन्मान देणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा तुला 'निर्भया' हे नाव ठेवणं आम्हाला अधिक सोयीचं वाटतं.

त्यानंतर दोन-चार दिवस महिलांच्या सुरक्षिततेविषयीच्या बातम्या येतात, मोठमोठे लेख लिहिले जातात. 'निर्भया'च्या वैद्यकीय उपचारांचा खर्च आम्ही करू असं सरकार जाहीर करतं...! कारण हे सगळं सोपं आहे गं, आमच्यासाठी. तुझ्यावर घरात, शाळा-कॉलेजात, रस्त्यात किंवा अगदी ट्रेनमध्ये अत्याचार होणार नाही ह्याची काळजी घेण्यापेक्षा तुझा वैद्यकीय खर्च उचलणं सोपं आहे, पटतंय ना!

मग एक दिवस तू थकतेस, दमतेस आणि शेवटचा श्वास घेऊन मोकळी होतेस. आठ वर्षांपूर्वी तू दिल्लीत होतीस, तीन वर्षांपूर्वी नगरला, गेल्या महिन्यात पुण्यात आणि मागच्याच आठवड्यात हिंगणघाटात! पण चिंता करू नकोस. आम्ही तुला न्याय मिळवून देऊ. आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात जाऊ. तुझं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करणाऱ्याला शिक्षा व्हावी म्हणून आम्ही वर्षानुवर्षं न्यायालयात तुझी बाजू मांडू! आणि पुढची १० वर्षं त्या न्यायालयीन लढ्याच्या बातम्या दैनिकांच्या आतल्या पानांवर येत राहतील, अशी तरतूद करू.

आणि हो, एक राहिलंच. तुझ्यासाठी एक मेणबत्ती मोर्चाही काढू!

तुझीच,सौ. शालिनी जितेंद्र ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या 

आज ती जळाली नाही समाज व्यवस्थेचा बुरखा जळाला"

अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

 'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील

"ताई तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे"

मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे : चंद्रकांत पाटील

रुग्णवाहिका अडवून नागरिकांनी पोलिसांवर केली दगडफेक

टॅग्स :हिंगणघाटमनसेआगनिर्भया गॅंगरेपमहिला