Join us

हिंदमाताच्या भूमिगत टाक्यांचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 13:09 IST

भरतीच्या काळात जोरदार पावसामुळे साचणारे पाणी साठविण्याची सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हिंदमाता परिसरात जोरदार पावसामुळे साचलेले पाणी उपसून ते साठवण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान आणि सेंट झेवियर्स मैदान येथे भूमिगत साठवण टाकी बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टाक्यांची क्षमता ही ६.४८ कोटी लीटर इतकी आहे. त्यामुळे भरतीच्या काळात जोरदार पावसामुळे साचणारे पाणी साठविण्याची सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली आहे. परिणामी, राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय, टाटा, वाडिया रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

ई -विभागात आनंदराव नायरमार्ग (नायर हॉस्पिटल) ते घास गल्ली या परिसरात पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने बॉक्स ड्रोन बांधण्याचा निर्णय घेतला असून आतापर्यंत ४५ टक्के काम या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काही अंशी दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. भायखळा स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरमार्ग ते दत्ताराम लाडमार्ग या भागात ही ब्रिम्स्टोवॅड प्रकल्प अंतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन तयार करण्यात येत आहे. या बॉक्स ड्रेनचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या शिवाय एफ दक्षिण विभागात वडाळा अग्निशमन केंद्र येथील भरणी नाका परिसरात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ९०० मिमी व्यासाची वाहिनी टाकली आहे.

लोकलचा खोळंबा नाही

मुख्याध्यापक भवन तसेच, आरसीसी बॉक्स ड्रेन, आरसीसी वाहिन्या घालणे, मिनी पंपिंग स्टेशन उभारणी, धारावी ९० फूट रस्त्याखाली मायक्रो टनेलिंगच्या माध्यमातून १८०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी घालणे कामे हाती घेतली होती. त्यामुळे सायन आणि माटुंगा स्थानकात पाणी साचून लोकलसेवेच्या खोळंब्यातून सुटका होणार आहे.

 

टॅग्स :मुंबईपाऊस