मुंबई - पहिलीपासून हिंदी सक्ती नकोच, अशी ठाम भूमिका मांडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला आहे, अशी माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यातील त्रिभाषा सूत्र समिती अहवाल २० डिसेंबरला राज्य सरकारला सादर करेल, अशी माहितीही जाधव यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत हिंदी असावी, पण पहिलीपासून सक्ती नको, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडल्याचे जाधव म्हणाले. भाषिक धोरणासंदर्भात जनमत जाणून घेण्यासाठी डॉ. जाधव हे नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्रिभाषा सूत्रासह शालेय शिक्षणातील इतर विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू : नरेंद्र जाधव भाषा समितीचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, प्रतिक्रिया त्यात समाविष्ट केल्या जातील. पुढील काही दिवसांत ते पुणे आणि नाशिकमध्ये जनमत बैठका आयोजित करणार आहेत. ५ डिसेंबरपर्यंत राज्य शासनाला अहवाल सादर करायचा होता, मात्र राज्यात काही ठिकाणी दौरा वाढल्याने अहवाल २० डिसेंबरपर्यंत सादर करू, असे जाधव यांनी स्पष्ट केले.आतापर्यंत सहभाग नोंदविलेल्यांपैकी ९५ टक्के जनतेचा प्राथमिक निष्कर्षानुसार आग्रह आहे की, हिंदीची सक्ती पहिलीपासून नव्हे तर पाचवीपासून सुरू व्हावी. अहवाल विद्यार्थ्यांच्या हितासाठीच तयार होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदी सक्तीकरिता ही समिती स्थापन झाली आहे, असा गैरसमज उद्धव ठाकरे यांचा झाला होता. मात्र तसे काही नाही, हे मी त्यांना स्पष्ट केले, असे जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.