Join us  

Himanshu Roy: कसाबची फाशी... ऑपरेशन एक्स... अन् 'स्पेशल १७'मधील हिमांशू रॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 3:52 PM

‘ऑपरेशन एक्स’च्या 17 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये होता हिमांशू रॉय यांचा समावेश.

मुंबई: दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे आज उघड झाले. मुंबई पोलीस दलातील एक नावाजलेले अधिकारी म्हणून ते सामान्यांना परिचित होते. आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास हाताळला होता. यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरण म्हणजे कसाबला फाशीसाठी येरवडा कारागृहापर्यंत नेण्याची मोहीम.

कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फासावर लटकवण्यात आले. अजमल कसाब याला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवायची होती. यासाठी त्यावेळी गृहमंत्रीपदावर असणारे आर. आर. पाटील यांनी यासाठी काही मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली होती. ज्यामध्ये हिमांशू रॉय यांचाही समावेश होता. या संपूर्ण मोहिमेला ‘ऑपरेशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते.

कमालीची गुप्तता

कसाबला येरवडय़ाला हलवताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. दोन्ही तुरुंगातील काही काही मोजके अधिकारी वगळता, इतर कोणालाही याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. आर्थर रोड तुरुंगात त्याच्यावर पहारा देणाऱ्या इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांनाही कसाब त्यांच्या सेलमध्ये नसल्याचे माहिती नव्हते. तीन दिवस आयटीबीपीचे २०० जवान रिकाम्या सेलवरच पहारा देत होते. १९ नोव्हेंबर रोजी कसाबला अत्यंत गुप्तपणे पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. हिमांशू रॉय यांनी आपली चोख जबाबदारी पार पाडत कसाबला येरवड्यात पोहोचवलं, जिथे त्याला फाशी देण्यात आली.

असे पार पडले ‘ऑपरेशन एक्स’.

५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळताच ऑपरेशन सुरू झाले.

विशेष पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी होती. तर सदानंद दाते, मीरा बोरवणकर, हिमांशू रॉय आदी १७ अधिकाऱ्यांनाच याबाबत माहिती होती.

ऑपरेशन सुरू झाल्यानंतर भारतींशिवाय अन्य सर्व अधिकाऱ्यांचे मोबाइल फोन पूर्णत: बंद होते. फक्त भारतीच वरिष्ठ पातळीवर संपर्क ठेवत होते.

७ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फाशीच्या फाइलवर स्वाक्षरी केली.

८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहखात्यामार्फत याबाबत कळवण्यात आले आणि त्याच दिवशी २१ नोव्हेंबर ही तारीख निश्चितही करण्यात आली.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात कसाबला डेंग्यू झाल्याचे सांगून त्याची जे. जे. रुग्णालयात तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात तो फाशीसाठी शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी ती वैद्यकीय तपासणी होती.

१९ नोव्हेंबर रोजी कसाबला अत्यंत गुप्तपणे पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आले. अगदी आर्थर रोड तुरुंगात पहारा देणाऱ्या २०० इंडो-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनाही त्याची माहिती नव्हती.

येरवडय़ातील कैदी कसाबला ओळखणार नाहीत याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली.

येरवडय़ात कसाबला ठेवलेल्या सेलची अतिशय बारकाईने झडती घेण्यात आली.

२० नोव्हेंबरला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुरक्षेबाबत सावधगिरीचे आदेश देण्यात आले.

बुधवारी सकाळी ७.३० वाजता कसाबला फाशी दिल्यानंतर भारती यांनी ‘ऑपरेशन एक्स यशस्वी’ असा संदेश संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाठवला.

येरवडय़ातच कसाबच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच कबर खोदून ठेवण्यात आली होती. मात्र, कबरीची नेमकी जागा केवळ दोन अधिकाऱ्यांनाच माहिती होती. 

टॅग्स :हिमांशू रॉयपोलिस26/11 दहशतवादी हल्ला