Join us  

Himanshu Roy: बरा होऊ लागला होता कॅन्सर; हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळं वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 3:11 PM

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता

मुंबईः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. दुर्धर अशा बोनमॅरो कॅन्सरला कंटाळून हिमांशू रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती मिळत होती. त्यांच्या 'सुसाइड नोट'मध्येही तसा उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पण, हिमांशू रॉय यांचा कॅन्सर तर बरा होऊ लागला होता, असा खुलासा पुण्यातील प्रसिद्ध कॅन्सर स्पेश्यालिस्ट डॉ. अनंतभूषण रानडे आणि नाशिकमधील डॉक्टर राज नगरकर यांनी केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'३० एप्रिलला हिमांशू रॉय यांच्या पीईटी स्कॅनने आम्हाला सुखद धक्का दिला होता. ते कर्करोगावर मात करू शकतील अशी आशा वाटू लागली होती. हा थेरपीचा चमत्कार असल्याचं मी त्यांना सांगितलं होतं आणि कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकेल, अशी चिन्हं असल्याचा विश्वासही त्यांना दिला होता. असं असताना, त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, हेच समजू शकत नसल्याची प्रतिक्रिया डॉ. अनंतभूषण रानडे यांनी व्यक्त केली.  

डॉ. राज नगरकर यांनीही 'मिड-डे'शी बोलताना, हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पीईटी स्कॅनमध्ये कॅन्सरचा अंश नसल्याचं कळल्यानं हिमांशू रॉय खूपच खूश झाले होते. आपण पुन्हा सेवेत रुजू कधी होऊ शकतो, असंही त्यांनी विचारलं होतं. तसंच, एका कार्यक्रमात कॅन्सरग्रस्तांशी मनमोकळा संवाद साधण्यासही ते उत्सुक होते. त्यामुळे कॅन्सरला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असं म्हणणं योग्य नसल्याचं डॉक्टर नगरकर म्हणाले. या दोन डॉक्टरांच्या दाव्यामुळे, हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय असेल, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

कर्तव्यनिष्ठ आणि 'डॅशिंग' आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याची बातमी शुक्रवारी आली आणि सगळेच हादरले. फिटनेसबाबत अत्यंत जागरूक आणि जिगरबाज, अशी ओळख असलेल्या अधिकाऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली होती. तेव्हा, दुर्धर अशा  कर्करोगामुळे ते मनाने खचले होते आणि त्या नैराश्याच्या भरात त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. परंतु, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांचा कॅन्सर बरा होऊ लागला होता आणि त्याची त्यांनाही कल्पना होती. 

उपचारांना कंटाळले होते हिमांशू रॉय?

दोन वर्षांपूर्वी, घोडेस्वारी करताना हिमांशू रॉय पडले होते. त्यांना दुखापत झाली होती. या दुखापतीच्या तपासण्या करताना, हिमांशू रॉय यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर हा लढवय्या माणूस या दुर्धर आजाराशी दोन हात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. पोर्तुगालला जाऊन त्यांनी रेडिओथेरपी करून घेतली होती आणि नंतर मुंबई-पुण्यात ते उपचार घेत होते. 

हिमांशू रॉय यांच्याशी बोलताना, ते खचून गेल्याचं कधीच जाणवलं नव्हतं. गुरुवारी तर ते जिममध्ये गेले होते. ते कदाचित उपचारांना कंटाळले असावेत, पण तसं कधी त्यांच्या बोलण्यात आलं नव्हतं, असं डॉ. रानडे यांनी सांगितलं. 

टॅग्स :हिमांशू रॉयपोलिसआत्महत्या