‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
By मनीषा म्हात्रे | Updated: October 6, 2025 10:10 IST2025-10-06T10:09:57+5:302025-10-06T10:10:24+5:30
वाहतूक पोलिसांनी ८ ते २८ सप्टेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत, भरधाव वेगासाठी ११ हजार १७३, तर बससाठीची राखीव लेन वापरल्यामुळे चार हजार ४२३ ई-चालानद्वारे कारवाई केली आहे.

‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
- मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोस्टल रोडवर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. अशाच एका अपघातात एका तरुणीसह बंदोबस्तावरील पोलिसाचा बळी गेला. कोस्टल रोडच्या बोगद्यात काही वाहनांनी थेट १४० चा वेग गाठल्याचे कारवाईतून उघडकीस आले. वाहनांच्या अति वेगाला ब्रेक लावण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळला असून, दिवसाला ५०० ई-चालानद्वारे कारवाई सुरू आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक पोलिसांनी ८ ते २८ सप्टेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत, भरधाव वेगासाठी ११ हजार १७३, तर बससाठीची राखीव लेन वापरल्यामुळे चार हजार ४२३ ई-चालानद्वारे कारवाई केली आहे. नियमांचे हे उल्लंघन ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (एएनपीआर) कॅमेऱ्यांद्वारे टिपण्यात येत आहे. ‘एएनपीआर’ कॅमेरे जुलैअखेरीस कार्यान्वित झाले, तर ई-चालानप्रणाली ४ सप्टेंबरला बोगद्यांसाठी आणि २७ सप्टेंबरला संपूर्ण कोस्टल रोडवर सुरू झाली आहे. त्यानुसार, ई-चालानद्वारे कारवाईचा वेग वाढला आहे.
कोस्टल रोड हा जरी उच्चगती मार्ग असला, तरी ठरवून दिलेल्या वेगाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. आमची टीम ‘एएनपीआर’ कॅमेऱ्यांद्वारे वेगमर्यादा आणि बस लेन उल्लंघन, यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. शिस्त राखण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. वारंवार उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हा दाखल केला जाईल, तसेच वाहन जप्त करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते.
अनिल कुंभारे, सहपोलिस आयुक्त, वाहतूक विभाग
वाहने सुसाट कधी?
कोस्टल रोडवर रात्री उशिरा किंवा पहाटे, तसेच जेव्हा रस्ता मोकळा असतो, तेव्हा वाहनचालकांकडून सर्वाधिक वेगमर्यादेचे उल्लंघन होते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
एकाच महिन्यात तीन अपघात
२८ सप्टेंबर २०२५
दोन कार एकमेकांना धडकल्या : दोन वाहने एकमेकांना धडकून अपघात घडले. या अपघातांत दोनजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही कारचे नुकसान झाले असून
पोलिसांनी या प्रकरणी मरिन ड्राइव्ह, वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
२१ सप्टेंबर २०२५
‘लॅम्बोर्गिनी’ दुभाजकाला धडकली : कोस्टल रोडवर एका भरधाव ‘लॅम्बोर्गिनी’ कारचा अपघात झाला. पावसामुळे रस्ता ओलसर झाल्याने कार घसरून दुभाजकाला धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वर्षभरात या मार्गावरील ‘लॅम्बोर्गिनी’चा हा दुसरा विचित्र अपघात आहे.
९ सप्टेंबर २०२५
पोलिसाने गमावला जीव : वरळी सी-लिंकच्या कनेक्टिंग पॉइंटजवळ बंदोबस्तावरील पोलिसांचा वाहनाच्या धडकेत अपघात झाला. उपचारादरम्यान हवालदार दत्तात्रय कुंभार यांचा मृत्यू झाला, तर महिला पोलिस जखमी झाली आहे.
१९ एप्रिल २०२५
टेम्पोचा पाठलाग करताना वॉर्डन समुद्रात: कोस्टल रोडवर टेम्पोचा पाठलाग करताना ट्रॅफिक वॉर्डनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. वॉर्डनचा समुद्रात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रफिक शेख असे मृत वॉर्डनचे नाव आहे.
८ फेब्रुवारी २०२५
तरुणीचा बळी : विद्यार्थिनीला चर्चगेट येथे सोडण्यासाठी निघालेल्या मित्राचा कारवरील ताबा सुटल्याने कोस्टल रोडवर हाजीअली जवळ अपघात झाला. त्यात गार्गी चाटे हिचा बळी गेला. तिचा मित्रही गंभीर जखमी झाला.