बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 06:53 IST2026-04-05T06:51:26+5:302026-04-05T06:53:20+5:30
मॅनेजर जय मुकेश मेहता याने २०१८ मध्ये केवायसीच्या बहाण्याने वृद्धेशी संपर्क साधला

बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विश्वास संपादन करून बँक मॅनेजर जोडप्याने ८५ वर्षीय वृद्धेची ७६.५० लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींनी गुंतवणुकीच्या बहाण्याने रक्कम थेट स्वतःच्या खात्यात वळवले. या प्रकरणी जोडप्यासह त्यांच्या त्याची आई, वडील व भाऊ यांच्यावर एमएचबी कॉलनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
एका बँकेच्या दहिसर शाखेचे मॅनेजर जय मुकेश मेहता याने २०१८ मध्ये केवायसीच्या बहाण्याने सीमा शरीफ निजाम यांच्याशी संपर्क साधला. त्याने बँक मॅनेजरची पत्नी सुनीता मेहता हिच्या शेअर मार्केट एक्सपर्ट प्रतिमेचा वापर केला. सीमा यांना ऑप्शन ट्रेडिंग करा, जबरदस्त परतावा मिळवा, असे प्रलोभन त्याने दाखविले. मात्र त्यांनी नकार दिला. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मेहता याने परदेशात मुलाला ५ लाख रुपये पाठवण्यास मदत केली. तसेच घरची बिलं भरून ‘घरचाच माणूस’ बनला. मोबाइल व बँक खाते लिंक करून ईमेल आयडी स्वतःच्या नियंत्रणात घेतला. त्यानंतर सेल ऑप्शन’ गुंतवणुकीच्या नावाखाली ७६ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र ही रक्कम मेहताच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.
खोटी आश्वासने, धक्कादायक ट्विस्ट
मेहताने तक्रादाराला १९ लाख परताव्याचे आमिष दिले. मात्र प्रत्यक्षात फक्त ५ लाख रोख देत उर्वरित १४ लाख लांबविले. त्यानंतर सतत टाळाटाळ सुरू झाली. गुंतवलेले पैसे मागायला गेल्यावर उलट नसिमाचीच बदनामी करण्यात आली. त्यांच्या मुलाला देखील ‘तुमची आई लोभी आहे, उद्धट असे मेहता दांपत्याने सांगितले. मात्र मुलाने कान उघडणी केल्यानंतर पोलिसात जाऊ नका विनवण्या करण्यात आल्या.
...अन् सत्य आले उजेडात
नोव्हेंबर २०२४ नंतर मेहताचे घर बंद आढळले. तसेच इतर चार पीडितही समोर आले ज्यांची फसवणूक करण्यात आली होती. नासिमा यांचे बँक स्टेटमेंट तपासल्यावर सर्व पैसे जय मेहताच्या वैयक्तिक खात्यात वळवल्याचा धक्कादायक खुलासा होत सत्य समोर आले.