ओशो इंटरनॅशनलला उच्च न्यायालयाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:06 IST2024-04-10T11:05:55+5:302024-04-10T11:06:09+5:30
कोरेगाव पार्कमधील जमीन विकता येणार नाही

ओशो इंटरनॅशनलला उच्च न्यायालयाचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाची जागा १०७ कोटी किमतीला विकण्याची परवानगी नाकारण्याच्या संयुक्त धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देणारी ओशो इंटरनॅशल फाउंडेशनची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. डिसेंबर २०२३ मध्ये संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी ओशो फाउंडेशनची याचिका फेटाळली होती.
कोरेगाव पार्क येथील जमीन विकण्यासाठी भाग पाडणारी परिस्थिती नाही, असे म्हणत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्ताने दिलेला निर्णय योग्य ठरविला. याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने राजीवनयन राहुलकुमार बजाज रुषभ फॅमिली ट्रस्टने जमीन खरेदीसाठी आगाऊ रक्कम म्हणून दिलेले ५० कोटी बिनव्याजी परत करण्याचे निर्देश ओशो फाउंडेशनला दिले. न्यायालयाला दिली. धर्मादाय आयुक्तांनी ओशो आश्रमाचे ऑडिट करण्याचे दिलेले निर्देशही योग्य ठरविले. ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे २००५ ते २०२३ या कालावधीचे विशेष ऑडिट करावे. दोन विशेष ऑडिटर हे ऑडिट करतील. त्यांची नियुक्ती सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई क्षेत्र, करतील. आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यावर ऑडिटरची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.