Join us

राज ठाकरेंना हाय कोर्टाचा दिलासा! कल्याण महापालिका निवडणुकीवेळचा गुन्हा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 15:33 IST

कोर्टाने समन्स बजावल्यानंतर राज यांनी २०११ मध्ये कोर्टात हजेरीही लावली होती. यावेळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळच्या एका प्रकरणात राज ठाकरेंना मुंबई हाय़ कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राज ठाकरे यांच्यावरील २०१० मधील प्रकरणातील नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे. 

महापालिका निवडणुकीवेळी राज ठाकरेंना रात्री कल्याण शहरात न राहण्याचा प्रतिबंधात्मक आदेश कल्याण पोलिसांनी बजावला होता. तो मोडल्याने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री १० वाजल्यानंतर थांबू नये आणि शहरात कुठेही वास्तव्य करू नये, कुठेही गाठभेट घेऊ नये, अशा आशयाची नोटीस राज ठाकरेंना बजावण्यात आली होती. परंतू ती राज ठाकरेंनी स्वीकारली नव्हती. 

यामुळे पोलिसांनी राज ठाकरे जिथे थांबले होते, तिथेच चिकटविली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कल्याण कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. कोर्टाने समन्स बजावल्यानंतर राज यांनी २०११ मध्ये कोर्टात हजेरीही लावली होती. यावेळी कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता. हा गुन्हा आणि खटला रद्द करण्यासाठी राज यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्तींनी ऑक्टोबरमध्ये निकाल राखून ठेवला होता. आज हा गुन्हा रद्द करण्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. 

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेउच्च न्यायालय