तिन्ही आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 00:55 IST2019-10-27T00:55:36+5:302019-10-27T00:55:52+5:30
तडवी आत्महत्या प्रकरण। माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला देण्याचे निर्देश

तिन्ही आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाची परवानगी
मुंबई : डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या तिन्ही डॉक्टरांना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली. मात्र, न्यायालयाने या तिघींनाही त्यांची सर्व माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला देण्याचे निर्देश दिले.
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आॅगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाने आरोपी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व अंकिता खंडेलवाल या तिघींची सशर्त जामिनावर सुटका केली आहे. त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली असली तरी खटला सुरू असेपर्यंत तसेच या खटल्याचा निकाल लागेपर्यंत उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय जामीनावर सुटलेल्या या तिघीही मुंबईबाहेर जाणार नाहीत, अशी एक अट न्यायालयाने जामीन देताना घातली.
उच्च न्यायालयाकडून घालण्यात आलेल्या या अटीनुससार आरोपी असलेल्या या तिघींनी दिवाळीसाठी गावी जाण्याकरिता परवानगी मागण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. तिन्ही आरोपींपैकी दोघी महाराष्ट्रातच असणार आहेत, तर एक आरोपी दिवाळीसाठी मध्य प्रदेशला जाणार आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
या तिघींनीही आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच या संदर्भातील खटला सुरू झाल्यास आपण त्यासाठी हजर
राहू. पळ काढण्याचा आपला हेतू नाही. केवळ काही वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालवायचा आहे, असे तिघींनी न्यायालयात यासंदर्भात सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे.
डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असेलल्या या तिन्ही आरोपी डॉक्टस तडवीच्या वरिष्ठ सहकारी होत्या. या तिघींनीही तडवीवर जातिवाचक टिप्पणी करून तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये तिच्या रूमवर गळफास लावून आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल या तिघींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.