Join us

मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी मद्यविक्री दुकाने सुरू ठेवण्यास हायकोर्टाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 06:44 IST

मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.

मुंबई : मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.

उच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर मद्यविक्रीची परवानगी दिली असली तरी २० व २१ ऑक्टोबर रोजी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश ४ ऑक्टोबर रोजी दिला होता. या आदेशाला महाराष्ट्र वाइन मर्चंट्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १३५ सी अंतर्गत हा आदेश काढला. या कलमांतर्गत मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई करण्यात आली.

जिल्हाधिकाºयांनी सर्व देशी दारू, ताडी व अन्य मद्यविक्री दुकान मालकांना १९ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजल्यानंतर ते २१ आॅक्टोबरपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला. तसेच जिल्हाधिकाºयांनी २४ ऑक्टोबर रोजीही संपूर्ण दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. याही आदेशाला असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले.

अन्य जिल्ह्यांत मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र मुंबईत मनाई केली, असे असोसिएशनने उच्च न्यायालयाला सांगितले. जिल्हाधिकाºयांचा आदेश मनमानी असून व्यवसाय करण्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. या निर्णयामुळे वाइन विक्रेत्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे याचिकाकर्र्त्यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने २४ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली.

टॅग्स :उच्च न्यायालयमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019