मुंबई : कबुतरखान्यांवरील बंदी उच्च न्यायालयाने कायम ठेवली असली तरी वाद अजून सुरूच आहेत. कबुतरखान्यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यातील वाद मिटलेला नाही. शनिवारीही दादरचा कबुतरखाना येथे दोन्ही बाजूंकडून वाद प्रतिवाद झाले.
आम्ही लहानपणापासून येथे राहत आहोत. आम्हाला कधीही कबुतरांचा त्रास झाला नाही. कबुतरांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. मग आताच त्यांच्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत हा शोध कोणी लावला, असा सवाल समर्थकांचा आहे. यापैकी काहींनी कबुतरांना दाणे टाकल्याबद्दल पाचशे रुपये दंडही भरला. दुसरीकडे विरोधकांचे म्हणणे आहे की, कबुतरखाने असावेत; पण ते शहराच्या मध्यभागी नसावेत. शहराबाहेर दूर अंतरावर मोकळ्या जागेत ते असावेत. कबुतरांना दाणे टाकल्यामुळे अन्न शोधण्याची त्यांची सवय मोडली आहे. त्यांच्यातील उडण्याची क्षमता संपली आहे. काही कबुतरे तर काही मीटर अंतर उडली, तरी थकून जातात. एक प्रकारे आपण कबुतरांना अपंग बनवले आहे. कबुतरखान्यांवर प्रेम करणाऱ्यांनी शेजारच्या इमारतीतील काही घरांना मग जाळ्या का बसवल्या , असा सवाल केला. त्यावर त्या इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे असे आहे की, कबुतरांना दाणे टाकणे सध्या बंद असल्यामुळे कबुतरे खाद्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत. चुकून एखादे कबुतर घरात आले, घरात पंखा सुरू असेल तर त्याला इजा होऊ शकते, इजा होऊ नये यासाठी आम्ही जाळ्या बसवल्या आहेत.
दुचाकीवरून आणले धान्य
दुचाकीवरून लालबागमधील एक व्यक्ती टोपलीत धान्य घेऊन दादरच्या कबुतरखाना येथे शनिवारी आला होता. काही लोकांनी त्यास मज्जाव केला. लालबाग भागातील कबुतरखाने बंद झाले, त्यामुळे मी इथे आलोय असे त्याचे म्हणणे होते. मी कबुतरखान्याच्या आतमध्ये जाऊन दाणे टाकत नाही, तर माझ्या खासगी वाहनावर पाटी घेऊन बसलो, असा त्याचा युक्तिवाद होता.