Join us
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाने आदेश देऊनही वडाळयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नाकारली पुरवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 15:14 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी देण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला.

ठळक मुद्देवडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी पुरवणी  नाकारण्यात आली.

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांसोबत पुरवणी देण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. मुंबई विद्यापीठाने ९ ऑक्टोबर रोजी पुरवणी न देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयाला  विधी महाविद्यालयातील मानसी भूषण या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संबंधित निर्णयाला स्थगिती देत पुरवणी देण्याचे आदेश दिले होते, तरीही  वडाळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी पुरवणी  नाकारण्यात आली. याउलट दक्षिण मुंबईतील महाविद्यालयात आज विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान पुरवणी देण्यात आली.

बहुतेक विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या बातम्यांची वर्तमान पत्रांची कात्रणे दाखवत महाविद्यालयांना पुरवणी देण्याची मागणी केली. मात्र तरीही महाविद्यालयांनी पुरवणी दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयांनी परीक्षेच्या सुरूवातीलाच पुरवणी देणार नसल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी छोट्या अक्षरांमध्ये उत्तरे लिहिल्याची माहिती एका विद्यार्थिनीने दिली.

दुपारी एक वाजता महाविद्यालयांना विद्यापीठाकडून निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर काही महाविद्यालयांनी पुरवणी देण्याची तयारी दर्शवली. याउलट चर्चगेटच्या केसी महाविद्यालयामध्ये पुरवणी हरवल्यास महाविद्यालय जबाबदार राहणार नसल्याचे प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थ्यांच्या सह्या करून घेतल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट