लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इटालियन फॅशन ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चप्पलांचा कथित गैरवापर केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. याचिकाकर्त्या सहा वकिलांना ही जनहित याचिका दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला.
तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही. मग तुमचा या प्रकरणाशी काय संबंध? आणि यात जनहित काय आहे, असा प्रश्न मुख्य न्या. अलोक अराध्ये आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.
कोल्हापुरी चपलांना भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त आहे आणि त्यांच्या डिझाइनचा प्राडाने अनधिकृत वापर केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा होता. मात्र, जीआय टॅगचे नोंदणीकृत मालक स्वत: न्यायालयात येऊन दाद मागू शकतात. त्यात इतर कोणीही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. खंडपीठाने याचिका फेटाळत याबाबत सविस्तर आदेश नंतर देऊ, असे स्पष्ट केले.
याचिकेतील मागण्याया महिन्याच्या सुरुवातीला याचिका दाखल करण्यात आली होती. कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतीक असून, भारतीय कारागिरांचे डिझाइन कॉपी केल्याबद्दल नुकसानभरपाईची मागणी याचिकेत करण्यात आली होती. प्राडाला अनधिकृतपणे टो-रिंग सँडल्सची विक्री न करण्याचे आदेश द्यावेत, त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक माफी मागावी तसेच कारागिरांना नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांचाही याचितकेत उल्लेख करण्यात आला होता.