३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 05:38 IST2025-12-27T05:38:49+5:302025-12-27T05:38:59+5:30
पायधुनी पोलिस पथकाची कारवाई; १६ ते २४ डिसेंबदरम्यान धडक मोहीम

३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पायधुनी पोलिस ठाण्याच्या पथकाने अमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली. पथकाने तब्बल ३६ कोटी ७४ लाख रुपयांहून अधिक किमतीचे हेरॉइन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ६ पुरुष व ३ महिला अशा एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, नऊ किलो हेरॉइन, कार, १२ मोबाइल आदी मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
१६ ते २४ डिसेंबरदरम्यान ही कारवाई झाली. १६ डिसेंबरच्या पहाटे मशीद बंदर परिसरात संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीच्या चौकशीत अमली पदार्थ विक्रीत गुंतलेली पुढील आठ जणांची साखळी उद्ध्वस्त करण्यात आली, असे पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले. १६ डिसेंबर रोजी मशीद बंदर (पूर्व) येथील पी. डी’मेलो रोड परिसरात पोलिसांनी सापळा रचून जलाराम नटवर ठक्कर (३७) आणि वसीम मजरूद्दीन सय्यद (२७) या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३२६.२२ ग्रॅम हेरॉइन (अंदाजे किंमत १ कोटी ३० लाख रुपये) जप्त करण्यात आले.
अशी झाली धडक कारवाई
मुस्कान शेख हिच्या चौकशीतून मेहरबान अली हा मुख्य पुरवठादार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या सांगण्यावरून माल घेऊन आलेला अब्दुल कादिर शेख यास पकडून त्याच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपयांचे हेरॉइन हस्तगत करण्यात आले. पुढे तपासात पोलिसांनी ओशिवरा, आनंद नगर येथे छापा टाकला असता, नवाजीस गालीब खान, सारिक मोहम्मद सलीम सलमानी आणि समद गालीब खान हे तिघे हेरॉइनच्या पुड्या पॅक करताना आढळून आले. या ठिकाणाहून तब्बल ३३ कोटी ८६ लाख रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात रुबिना मोहम्मद सय्यद खान (३०) या महिलेचा सहभाग उघड झाला. हा माल शबनम शेख हिचा असल्याचे समोर आल्यानंतर तिला अजमेर (राजस्थान) येथून अटक केली. त्यानंतर मुस्कान समरूल शेख (१९) हिलाही मशीद बंदर परिसरातून अटक केली. गावकर, निरीक्षक अभिजित शिंदे (गुन्हे), निरीक्षक सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन लहामगे, अनिल वायाळ आणि पथकाने गोपनीय माहिती आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.