Join us

मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील हेरिटेज वस्तुसंग्रहालय ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 02:51 IST

रोज परदेशातील १०-१५ जणांचा ग्रुप एकत्र येऊन हेरिटेज इमारत आणि वस्तुसंग्रहालयाला भेट देतो.

मुंबई : प्रत्येक सिनेमात मुंबईचा चेहरा दाखविताना मध्य रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत दाखविली जाते. ही हेरिटेज इमारत मुंबईची ओळख आहे. त्यामुळे रोज देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देण्यासाठी येतात. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे हेरिटेज वस्तुसंग्रहालय ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, रेल्वेला दररोज लाखो रुपयांच्या महसुलाला मुकावे लागेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीचा इतिहास, ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांसह अनेक महाविद्यालये, शाळेतील विद्यार्थी दररोज मोठ्या संख्येने येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी, तसेच वस्तुसंग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. परिणामी, वस्तुसंग्रहालय बंद ठेवण्यात येईल.

रोज परदेशातील १०-१५ जणांचा ग्रुप एकत्र येऊन हेरिटेज इमारत आणि वस्तुसंग्रहालयाला भेट देतो. म्हणजे रोज ७० ते १०० देशी पर्यटक येतात. या पर्यटकांकडून हेरिटेज इमारत आणि वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे या पर्यटकांना प्रत्येक बाबींची माहिती मार्गदर्शकाकडून दिली जाते. मात्र ३१ मार्चपर्यंत वस्तुसंग्रहालय बंद असल्याने रेल्वेला दररोज लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.

टॅग्स :रेल्वे