मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला रेड अलर्ट; आजही कोसळधारा
By सचिन लुंगसे | Updated: July 9, 2024 00:05 IST2024-07-09T00:05:04+5:302024-07-09T00:05:19+5:30
किनारपटटीच्या भागात पावसाचा वेग जास्त

मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला रेड अलर्ट; आजही कोसळधारा
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या २४ तासांत २५० ते ३०० मिमी पावसाच्या नोंदी झाल्या असून, मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबईत मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता आहे. गुजरातपासून केरळपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र तयार होते; तेव्हा अरबी समुद्रातून येणा-या वा-याचा वेग वाढतो. हे वारे किनारपटटीच्या भागात बाष्पयुक्त वारे घेऊन येतात. परिणामी किनारपटटीच्या भागात पावसाचा वेग जास्त दिसून येतो.
सध्या गुजरातपासून केरळच्या किनारपटटीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे संपुर्ण किनारपटटीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. सहयाद्रीच्या घाट भागावरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळेही येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
-------------
कुठे आहे अलर्ट : मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत
रेड - मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुर्ग
ऑरेंज - पालघर, ठाणे, कोल्हापूर, अमरावती, अकोला, यवतमाळ