मुंबई: गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत आज पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. तर मुंबई उपनगरात सकाळपासून पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, वरळी, लालबाग, सायन, कुर्ला, अंधेरीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील २४ तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. हिंदमाता परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे या भागांतील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्यामुळे अनेकजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशातच गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नवी मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. पावसामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे देखील समोर आले आहे.
दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली आहे.