शहरात जोरदार पाऊस, पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालताय?... तर मग हे वाचा

By संतोष आंधळे | Updated: July 8, 2024 22:30 IST2024-07-08T22:29:53+5:302024-07-08T22:30:16+5:30

साचलेल्या पाण्यातून चालला असाल आणि ताप सदृश लक्षणे असतील तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या

Heavy rains in the Mumbai city if walking through puddles of rain Then read this | शहरात जोरदार पाऊस, पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालताय?... तर मग हे वाचा

शहरात जोरदार पाऊस, पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालताय?... तर मग हे वाचा

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहरात जोरदार पाऊस झाला असल्यामुळे सोमवारी शहराच्या विविध भागात पाणी साचले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत आपल्या इच्छित स्थळी पोहचवे लागले होते. मात्र अशा साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळी आजार होण्याची शक्यता असतो. त्यामुळे जर साचलेल्या पाण्यातून चालला असाल आणि ताप सदृश लक्षणे असतील तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

दरवर्षी रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. अनेकदा नागरिकांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने ते याच पाण्यातून येजा करतात. रस्त्यांवरील बिळांमध्ये पाणी शिरल्याने घुशी, उंदीर बाहेर येतात. त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात असते. शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले असले तरी अनेकवेळा पर्याय नसतो.

जूनमध्ये मारले ४० हजार उंदीर

काही दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिसचे २८ रुग्ण आढळून आले आहे. तसेच या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. साचलेल्या पाण्यातून चालल्यानंतर ताप आल्यास औषधोपचारासाठी ८,००४ नागरिकांना गोळ्या दिल्या आहेत, तर दुसरीकडे जूनमध्ये विषारी गोळ्यांचा वापर करून २,०५६ उंदीर मारले आहेत, तर पिंजरे लावून पकडून २,६२३ उंदीर मारले आहेत. त्याचबरोबर ३४ हजार ९६७ इतके सर्वाधिक उंदीर रात्रपाळीत पकडून मारले आहेत.

काय काळजी घ्याल?

- पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून चालू नये. जर जायचेच असेल, तर गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. जेणेकरून दूषित पाण्याचा संपर्क येणार नाही.
- पायावर कोणतीही जखम असेल, तर तिच्यावर तत्काळ उपचार करावेत. कारण दूषित पाणी जखमेद्वारे शरीरात जाऊ शकते.
- सांडपाणी मिसळलेल्या पाण्यातून चालू नये.
- साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर घरी पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन घ्यावे.
- तापासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या पाण्यातून चालल्यामुळे जर कुणाला तापाची लक्षणे आली असतील तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुणीही अंगावर दुखणे काढू नये आणि स्वतः औषध उपचार करू नये. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत.
-डॉ राहुल पंडित, संचालक-क्रिटिकल मेडिसिन, सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल

Web Title: Heavy rains in the Mumbai city if walking through puddles of rain Then read this