Join us  

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 8:46 AM

Mumbai Rain : आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली होती. मात्र, आज मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.     

आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर, दादर, अंधेरी आणि कुर्ला या भागांमध्ये पाणी साचले आहे. दादरच्या हिंदमाता परिसरालाही नेहमीप्रमाणे तलावाचे स्वरुप आले आहे. या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. 

पश्चिम व पूर्व उपनगरातही अंधेरी सबवे, बांद्रा, पवई, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे निचरा करण्यात आला. दुसरीकडे, पावसाची सध्याचा स्थिती पाहता लोकल ट्रेन्सचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे कालपासूनच लोकल ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. पावसाचा सध्याचा जोर पाहता आजही मुंबईतील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

सुमारे महिनाभराच्या विलंबाने पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे, यामुळे धरणसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली तर मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेण्यात येईल. तसेच, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला सुरुवात करता येईल.

 

टॅग्स :मुंबईपाऊसमहाराष्ट्र