Join us

जोरदार पावसामुळे मुंबईची 'तुंबई', हवाई वाहतूक उशिराने तर रस्ते आणि रेल्वे दोन्ही ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 20:12 IST

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे

मुंबई, दि. 29 - गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचं स्वरुप आलं आहे. गेल्या 24 तासात 152 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, कर्मचा-यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. 

जोगेश्वरी, चर्चगेट जंक्शन आणि सात रस्ता येथे झाड पडल्याने वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. दादर टीटीजवळ पाणी साचल्याने वाहूतक कोंडी झाली आहे. वरळी, लालबाग, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं असून सिद्धीविनायक मंदिर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं आहे. 

हायवेंवरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. पावसाचा परिणाम रेल्वेवरही झाला असून नेहमी उशिरा धावणारी मध्य रेल्वे एक ते दोन तास उशिराने धावत असून ठप्प झाल्याचीच परिस्थिती आहे. तांत्रिक अडचणींमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वांद्रे स्थानकात रोखण्यात आली आहे. हार्बर रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली असून वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेक स्थानकांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने त्यांनाही नद्याचं स्वरुप आलं आहे. नेहमी गर्दी असणारं सीएसटी स्थानक तर ओस पडलं आहे. 

मुसळधार पावसामुळे मुंबईतील दुपारच्या सत्रातील स्कूल बसेस बंद राहणार असून दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. फक्त रस्ता आणि रेल्वेच नाही तर हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. विमानांची उड्डाणं 30 ते 40 मिनिटं उशिराने होत आहेत. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकार