Heats the heat wave | उष्णतेच्या लाटेने होरपळ कायम
उष्णतेच्या लाटेने होरपळ कायम

मुंबई : दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून मध्य भारतातील काही ठिकाणी कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास नोंद झाले आहे. २६ ते २९ मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील. तर २६ ते २८ मे दरम्यान परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील. दुसरीकडे शनिवारसह रविवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २७ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरी जवळपास नोंदविण्यात आले.
स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालच्या उत्तर भागासह सिक्कीममध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड आणि ओरिसामध्येही पाऊस पडेल. अंदमान व निकोबारसह लक्षद्वीप येथेही पाऊस सुरू राहील. दक्षिण कर्नाटकमध्ये पाऊस पडेल. उत्तर पश्चिम तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारी भाग, गोवा
आणि केरळमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
>धुळीचे वादळ
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पाऊस पडेल. पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानमध्ये काही ठिकाणी धुळीच्या वादळासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये हवामान कोरडे राहील, तर मध्य भारतात उत्तर पश्चिम दिशेने वारे वाहत आहेत. परिणामी हवामान उष्ण आणि कोरडे राहील. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उष्णतेची लाट येईल. छत्तीसगडच्या दक्षिण भागात पाऊस पडेल.
>उष्ण वाऱ्यांमुळे तापमानवाढ
गेल्या तीन दिवसांपासून मध्य भारतातील काही ठिकाणी कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. येथे उष्णतेची लाट नोंदविण्यात येत असून, राजस्थानमधून वाहणारे कोरडे आणि उष्ण वारे यास कारणीभूत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुढील चार ते पाच दिवस दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील काही भाग, ओरिसाचा काही भाग, महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरातमधील पूर्व भाग आणि राजस्थानचा दक्षिण भाग येथे उष्णतेची लाट राहील.
>मान्सूनची प्रतीक्षाच...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनच्या आगमनापूर्वी दक्षिण भारतातील हवामानात बदल नोंदविण्यात येतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव ओसरतो. शिवाय काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरीही कोसळतात, मात्र या वेळी चित्र वेगळेच आहे. कारण मान्सून लांबला असून, ४ जूनच्या आसपास तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


Web Title: Heats the heat wave
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.