मुंबई पुन्हा तापणार! पूर्वेकडून उष्ण वारे वाहण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:07 IST2026-03-08T15:06:45+5:302026-03-08T15:07:01+5:30
उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.

मुंबई पुन्हा तापणार! पूर्वेकडून उष्ण वारे वाहण्यास सुरुवात
मुंबई: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत हवामान उष्ण राहील.
महामुंबई मध्ये उष्णतेची लाट ११ मार्चपर्यंत कायम राहणार असून १२ आणि १३ तारखेला तापमान किंचित खाली येईल. तर उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम म्हणून रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरात कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल. ठाणे आणि नवी मुंबईचे तापमान ३९ ते ४१ अंशांच्या आसपास राहील. तर मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशांच्या आसपास राहील. १३ मार्चनंतर उत्तर पश्चिम दिशेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाल्यानंतर कमाल तापमानात किंचित घसरण होईल. परंतु तोवर मात्र मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्ण वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम राहणार असून कमाल तापमानाचा पारा ३६ ते ४० च्या आसपास नोंदविण्यात येईल. पुण्यात कमाल तापमान ३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.