Join us

ऊन वाढले, काळजी घ्या! उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली, चार दिवस तापदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 06:27 IST

मुंबईत कमाल तापमानाची नोंद ३८.६ अंश सेल्सिअस झाली.

मुंबई : बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबई महानगर प्रदेशात धडकलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचे तापमान ३८ ते ४० अंश नोंदविण्यात आले. मुंबईतही कमाल तापमानाची नोंद ३८.६ अंश सेल्सिअस झाली. पुढील चार दिवस राज्यासाठी तापदायक आहेत. या चार दिवसात तापमान ३८ ते ४० अंशावर जाईल, तर विदर्भात ते ४० पार नोंदविले जाईल, असा अंदाज आहे.

मध्य प्रदेश किंवा लगतच्या परिसरातून उत्तर कोकणात येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईला उष्णतेच्या लाटा तडाखा देत आहेत. मंगळवारी मुंबईचे तापमान उच्चांकी म्हणजे ३९ अंश नोंदविण्यात आले. बुधवारी ते ३८ अंशांवर होते. गुरुवारी मात्र ते किंचित घसरण्याची शक्यता आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

विदर्भात उष्णतेची लाट आली असून, बहुतांश जिल्ह्यांच्या मुख्यालयाचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोचले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदविण्यात आले.  

कुठे किती तापमानमुंबई    ३८.६ ठाणे    ३८.४ ऐरोली    ३९.२ कोपरखैरणे    ३९.१ पनवेल    ३९.३कल्याण    ३९.४भिवंडी    ३९.४  

मुंबईच्या कमाल तापमानात गुरुवारी आणि शुक्रवारी घट होईल. कमाल तापमानात एक ते दीड अंशाची घसरण होऊन मुंबईकरांना दिलासा मिळेल, असा अंदाज आहे - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र

राज्यात आगामी चार दिवस कमाल तापमान ३८ ते ४० अंश असेल. गुरुवारपासून कमाल तापमानात घट होईल, तर १४ आणि १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट येईल- कृष्णानंद होसाळीकर, माजी हवामान अधिकारी 

टॅग्स :मुंबईउष्माघाततापमान