मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) हंगाम २२ मार्चपासून सुरू होत असून त्यानंतर आपण उपलब्ध होणार नसल्याने समझोत्यासाठी देऊ केलेला सहा महिन्यांचा कालावधी रद्द करण्यात यावा आणि घटस्फोटाच्या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, या क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय देत गुरुवारी, २० मार्च रोजी चहलच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश कुटुंब न्यायालयाला दिले. युझवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
काय घडणार?विभक्त होण्याची इच्छा असलेल्या दाम्पत्याला कायद्यानुसार सहा महिन्यांचा समझोता कालावधी देण्यात येतो. मात्र, तो रद्द करावा अशी याचिका युझवेंद्र आणि धनश्री यांनी २० फेब्रुवारीला कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. मात्र, ती फेटाळली. त्यावर उभयतानी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. बुधवारी त्यावर न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. न्या. जामदार यांनी कुटुंब न्यायालयाला चहलच्या याचिकेवर २० मार्च रोजी निर्णय घेण्याचे निर्देश दिले.