आरोग्य अधिकारी घेताहेत नोकरीचे पहिले केंद्र दत्तक; प्रकाश आबिटकरांची आगळीवेगळी संकल्पना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 07:48 IST2025-02-20T07:47:58+5:302025-02-20T07:48:18+5:30
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे.

आरोग्य अधिकारी घेताहेत नोकरीचे पहिले केंद्र दत्तक; प्रकाश आबिटकरांची आगळीवेगळी संकल्पना
मुंबई : सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोकरीचे पहिले आरोग्य केंद्र दत्तक घ्यायचे आणि या केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी लक्ष केंद्रित करायचे अशा या संकल्पनेला आता आरोग्य अधिकारी कृतिशील प्रतिसाद देऊ लागले आहेत.
नोकरीमध्ये पदोन्नती मिळते, अनेक ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते, पण अधिकारी पहिल्यांदा जिथे नोकरीला लागतात त्या जागेविषयी वेगळी अन् आपलेपणाची भावना मनात असते. हाच धागा पकडून पहिल्या नोकरीचे ठिकाण अधिकाऱ्यांनी दत्तक घेतले तर त्या आरोग्य केंद्र/ रुग्णालयात गुणात्मक बदल अधिकारी घडवून आणू शकतील हा विचार आबिटकर यांनी मांडला आणि तो प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली आहे.
दत्तक केंद्रावर विशेष लक्ष
दत्तक घेतलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये आहारसेवा कशी आहे, नियमित प्रशिक्षण दिले जाते का, आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था कशी आहे, रुग्णवाहिका उपलब्ध आहे का, बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते की नाही, प्रसूती वाॅर्ड, ऑपरेशन थिएटर स्थिती कशी आहे, लसीकरण नियमित होते का, अग्निशमन उपकरणांची स्थिती, प्रसाधनगृहांची स्थिती, बायोमेट्रिक हजेरीनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन होते का याकडेही हे अधिकारी लक्ष देतील.
पहिल्या टप्प्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक, व सहसंचालक दर्जाचे अधिकारी आरोग्य केंद्रे दत्तक घेतील, नंतर आणखी अधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली जाईल.
आतापर्यंत ३४ जिल्हा आरोग्य अधिकारी, ३४ जिल्हा शल्यचिकित्सक, २३ आरोग्य उपसंचालक यांनी आपल्या पहिल्या नोकरीचे आरोग्य केंद्र दत्तक घेतले आहे.
पहिल्या नोकरीचे महत्त्व वेगळे असते, त्या जागेशी अनेकांचे ऋणानुबंध बरीच वर्षे कायम राहतात. त्याचा कृतिशील उपयोग करण्याचे आम्ही ठरविले. आपल्या नोकरीच्या जागेव्यतिरिक्त आणखी एका ठिकाणी चांगली सेवा देण्याची संधी या निमित्ताने अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री