Join us

ज्याने स्वत:ची गाडी जाळली, त्यानेच सदावर्तेंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या; गेवराई पायगा गावचा सरपंच मुंबईत आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 14:00 IST

आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची मुंबईत तोडफोड करण्यात आली.

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, आज सकाळीच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड मराठा आदोलकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक केली आहे. हे तिघेही मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित असल्याचे समोर आलं आहे, यातील मंगेश साबळे हे नाव चर्चेत आहे. साबळे यांनी काही दिवसापूर्वी स्वत:ची गाडी पेटवत निषेध केला होता. 

गुणरत्न सदावर्तेंविरोधात प्रसिद्ध वकीलांची एन्ट्री! मराठा आंदोलकांची केस एक पैसा न घेता लढणार

मंगेश साबळे हे वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे चर्चेत असतात. मंगेश साबळे हे संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. याअगोदर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केल्यामुळे ते चर्चेत होते. साबळे यांनी काही दिवसापूर्वी पंचायत समितीसमोर पैसे उधळत आंदोलन केले होते.  या आंदोलनाची माध्यमांनीही दखल घेतल्याने अखेर लाचखोर बीडीओला निलंबित करण्यात आले होते. यामुळे मंगेश साबळे चर्चेत आले होते. विहिरीच्या योजनेसाठी अधिकारी पैशाची मागणी करतात असा त्यांनी आरोप केला होता. 

अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते, यावेळी पोलिसांनी महिलांना लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच राज्यभर निषेध केला जात होता, यावेळी मंगेश साबळे यांनी रस्त्यातच स्वत:ची गाडी पेटवून निषेध व्यक्त केला होता. यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे, राज्यभरातून त्यांना पाठिंबा मिळाला आहे. आज सकाळी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यातही मंगेश साबळे यांचा सहभाग आहे, त्यांच्यासह अन्य तिघांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. यासाठी २४ ऑक्टोबरची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात केली आहे. तर दुसऱ्याच दिवशी वकील सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली, राज्यात नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे, यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मुद्दा पुन्हा एकदा पेटणार असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणगुणरत्न सदावर्तेमनोज जरांगे-पाटीलमुंबई