न शिकता मंत्रिपद मिळाले, शिकणाऱ्याचे काय झाले..?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 22, 2024 08:19 IST2024-12-22T08:17:24+5:302024-12-22T08:19:13+5:30

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत...

He got a ministerial position without studying, what happened to the student..? | न शिकता मंत्रिपद मिळाले, शिकणाऱ्याचे काय झाले..?

न शिकता मंत्रिपद मिळाले, शिकणाऱ्याचे काय झाले..?

नागपूर अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेल्या नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना नमस्कार..! तुमच्यापैकी अनेकांनी नागपूरला काय झाले, अशी विचारणा केली म्हणून हा पत्रप्रपंच. नागपूर अधिवेशन शनिवारी संपले. अधिवेशनात जनतेचे प्रश्न सुटतात, असे जनता जनार्दनाला अधूनमधून वाटत असते. असे वाटणे समाजाच्या तब्येतीसाठीही बरे असते. कुठूनच प्रश्न सुटणार नाही असे वाटले तर अधिवेशन कशाला घेता? त्यावर खर्च कशाला करता? असे नको ते प्रश्न येतील. त्यामुळे अधिवेशन सुरू होताना अमुक अमुक प्रश्न मार्गी लावणार असे सांगितले जाते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत...

एक आठवड्याचे हे अधिवेशन बिन खात्याच्या मंत्र्यांनी पार पाडले. आपल्याला कोणते खाते मिळणार, हा प्रश्न या अधिवेशनात सुटेल अशी तीव्र इच्छा मनात बाळगून चाळीसहून अधिक मंत्री उत्साहाने आले होते. मात्र अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खाते वाटपाचाच प्रश्न सुटला नाही. कदाचित आज, उद्या किंवा पुढच्या अधिवेशनाच्या आधी नक्की सुटेल... विधानभवनात काही तणावात तर काही अस्वस्थतेत फिरत होते. त्यांच्या मागेपुढे फिरणारा त्या त्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा ताफाही यावेळी दिसला नाही... मंत्रिमंडळातील अनेक मंत्री पत्रकारांनाच, खाते वाटपाचे काही कळाले का? असे विचारताना दिसले. पत्रकारांना प्रश्न विचारायची सवय असते. प्रश्नाला उत्तर द्यायची सवय नसते ना... त्यामुळे थेट मंत्र्याकडूनच प्रश्न आला की पत्रकारांचे चेहरे कसेनुसे होत होते... सगळ्या जगाची माहिती आपल्यालाच असते, अशा अविर्भावात फिरणाऱ्या अनेक पत्रकारांची कवचकुंडले या प्रश्नावर मात्र गळून पडताना पाहायला मिळाली...

एखादी माहिती माध्यमांना कळू द्यायची नाही, असे जर मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर काय होऊ शकते याचे दुसऱ्या नंबरचे उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिले आहे. पहिल्या नंबरचे उदाहरण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबांनी घालून दिले होते. दहा दिवस झाले. एकाही पत्रकाराला जसा मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा सुगावा लागला नाही तसाच मुंबईवर २६/११ चा हमला करणाऱ्या ९ अतिरेक्यांच्या डेडबॉडी जे. जे. हॉस्पिटलच्या शवागारात ठेवल्याचे सांगितले जात होते. मात्र त्या मृतदेहांची विल्हेवाट लावल्यानंतर काही महिन्यांनी आबांनी हा गौप्यस्फोट विधान परिषदेत केला. या विषयाची फाइल दहा टेबलवर फिरली. मात्र कोणालाही कानोकान खबर लागली नाही. ते नऊ मृतदेह कुठे दफन केले हे एकही पत्रकार आजपर्यंत शोधून काढू शकला नाही. माहिती गुप्त ठेवण्याच्या बाबतीत आबांसारखेच फडणवीस सगळ्या माध्यमांवर वरचढ ठरल्याचे या अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात काही मंत्री बसले होते. आपल्याला कोणते खाते मिळणार यावर त्यांच्यात चर्चा रंगली होती. एक आमदार म्हणाले, मी लहानपणी फार शिकलो नाही. सहावीनंतर शाळा सोडून दिली. काय करायचे म्हणून राजकारणात आलो... आणि आता मंत्री झालो..! त्यावर दुसरे मंत्री म्हणाले, तुम्हाला शालेय शिक्षण खाते मिळाले तर... आणि तिथे हास्याचा स्फोट नसेल तर नवल...! दुसरे मंत्री म्हणाले, मीदेखील फार शिकलो नाही. शिकण्यापेक्षा राजकारणाची आवड लागली... बघा आवडीचे रूपांतर आता मंत्रिपदात झाले. कुठले का खाते मिळेना, मंत्री झालो हे काय कमी आहे का..? दुसरे एक मंत्री म्हणाले, आपल्यासाठी काही धर्मगुरू धावून आले. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा फार काही उपयोग झाला नाही... हे सगळे ऐकणारे राहुल नार्वेकर शांतपणे म्हणाले, मी खूप शिकलो त्यामुळे इच्छा नसूनही अध्यक्ष व्हावे लागले... त्यावर उपस्थितांना अध्यक्षांविषयी अभिमान बाळगावा की खंत व्यक्त करावी हेच कळेना.... एका मंत्र्यांनी पत्रकारालाच खाते - वाटपाबद्दल विचारले. त्या पत्रकारानेदेखील, मी आजच मुख्यमंत्र्यांशी बोललोय. उद्याच खाते वाटप होईल, असे त्यांनी मला खाजगीत सांगितल्याची माहिती मंत्र्यांच्या कानात सांगितली... मंत्री होते. ते म्हणाले, 'आज नगद, कल महोदय हुशार उधार' अशी पाटी अनेक दुकानात असते... तसेच उद्याचे आहे... उद्या म्हणजे कधी हे त्यांनी सांगितले का? असे विचारताच त्या पत्रकाराने शिताफीने विषय बदलला...

अडीच वर्षांनी पुन्हा मंत्रिमंडळात बदल होणार. एक फळी बदलून दुसरी फळी मंत्री होणार... या बातमीने अधिवेशन काळात चांगला जोर पकडलेला दिसला. महायुतीचे तीनही प्रमुख नेते अडीच वर्षांनी तुम्हालाच मंत्रिपद मिळेल असे सांगताना दिसले. मात्र आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर या आमदारांचा विश्वास नसल्याचे चित्रही दिसले. एकदा का मंत्रिपद मिळाले की कोण कशाला सोडेल... त्यामुळे मंत्रिपद न मिळालेले अनेक जण अधिवेशनात त्रस्त चेहऱ्याने फिरताना दिसले. आम्ही आता मंत्रिपदाची आशा सोडली आहे असे सांगणारे काही भेटले... तर काही आशावादी आमदारही भेटले. अडीच वर्षांनंतर आपल्याला शंभर टक्के मंत्रिपद मिळणार असेही पश्चिम महाराष्ट्रातील एक नेते सांगत होते. अर्थात, ते काही वेळापूर्वीच फडणवीस यांच्या दालनातून बाहेर पडले होते...

अधिवेशनात इतकी महत्त्वाची चर्चा सुरू असल्यामुळे राज्यातल्या अन्य प्रश्नांवर चर्चा करायला कोणाला वेळ मिळालेला दिसला नाही... त्यामुळे राहिलेल्या प्रश्नांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होईल हे नक्की... अर्थसंकल्पामुळे जर काही प्रश्न राहिले, तर ते पावसाळी अधिवेशनात नक्की मार्गी लावले जातील... कदाचित तुम्ही हे वाचेपर्यंत खातेवाटपाचा प्रश्न सुटलेला असेल. - तुमचाच बाबूराव
 

Web Title: He got a ministerial position without studying, what happened to the student..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.