मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचा जीव वाचला. लोकल स्थानकातून सुटल्यानंतर प्रवाशाने तिच्यामध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाय घसरल्याने तो खाली पडला. तो प्लॅटफॉर्म आणि लोकलच्यामध्ये अडकत असतानाच जवान धावून आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंधेरी स्थानकातील घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या या व्हिडीओमध्ये दोन जवान एका प्रवाशाचा जीव वाचवताना दिसत आहेत.
ही घटना मंगळवारी (१८ फेब्रुवारी) रात्री ९.१० मिनिटांनी घडली. चर्चगेटला जाणारी जलद लोकल प्लॅटफॉर्म ७ वर आली होती. गाडी सुटत असतानाच एक प्रवासी चढत होता. चढत असतानाच पाय घसरून त्याचा तोल गेला.
तोपर्यंत लोकलने वेग पकडला होता. वेगामुळे त्याचा हातही निसटला. त्यानंतर प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. मात्र, हवेच्या वेगामुळे प्लॅटफॉर्म लोकलच्या मध्ये खेचला गेला. त्याचवेळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान धावून आले आणि त्यांनी प्रवाशाला बाहेर खेचले.
जवान हनुमंत शिंदे आणि संदीप मराठे यांनी या प्रवाशाचे प्राण वाचवले. त्यानंतर प्रवाशावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला बरे वाटल्यानंतर सोडण्यात आले.