शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:43 IST2025-12-30T13:41:36+5:302025-12-30T13:43:09+5:30
या गदारोळात एका पक्षाचा उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात पोहचला. मात्र, ताे फॉर्मच विसरल्याने काही काळ हास्याचा फवारा कार्यकर्त्यांमध्ये उडाला...

शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
मनीषा म्हात्रे -
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारी मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी परिसरात चांगलाच रंग चढला. टी आणि एस वॉर्डाच्या निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरण्यास सुरुवात केली. या गदारोळात एका पक्षाचा उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात पोहचला. मात्र, ताे फॉर्मच विसरल्याने काही काळ हास्याचा फवारा कार्यकर्त्यांमध्ये उडाला.
एका पक्षाचा उमेदवार गोवंडी, मानखुर्द, भांडुप, सोनापूर येथील कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत गाड्यांचा ताफा घेऊन टी वाॅर्डच्या कालिदास येथील निवडणूक कार्यालयाबाहेर पोहचला. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत मोजक्याच लोकांना आत प्रवेश देणार असल्याचे सांगितल्यानंतर उमेदवार गाडीतून उतरला. मात्र, आत जाण्याआधीच त्याने ‘अरे, फॉर्म किधर है?’ असे विचारल्यावर कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. चौकशीअंती उमेदवारी अर्ज घेऊन येणारा कार्यकर्ता मागेच राहिलेल्या गाडीत असल्याचे लक्षात आले.
कार्यालयाबाहेर थांबलेली गर्दी “भाई, अंदर क्यों नहीं जा रहे?” असा सवाल करत होती. तेवढ्यात “कुछ नहीं, फॉर्म भूल गये” ही कुजबुज पसरताच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दहा मिनिटांनंतर अर्जाची फाईल घेऊन कार्यकर्ता धापा टाकत पोहोचला आणि त्यानंतर उमेदवार कार्यकर्त्यांसह निवडणूक कार्यालयात दाखल झाला.
नील सोमय्या प्रभाग १०७ मधून रिंगणात
मुलुंडमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी प्रभाग क्रमांक १०७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी ते प्रभाग १०८ चे नगरसेवक होते. यावेळी पक्षाने त्यांना १०७ मधून संधी दिली आहे. भाजपकडून प्रभाकर शिंदे, अनिता वैती यांनीही अर्ज भरला. काँग्रेसकडून हेमंत बापट, तर काही अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरणे सुरू होते.