तुम्हाला गॅस कनेक्शन बंदचा संदेश आलाय? सावधान! 'त्या' बिलावर क्लिक अन् बँक खाते त्वरित रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:46 IST2026-03-20T15:42:55+5:302026-03-20T15:46:18+5:30
सायबर भामट्यांनी उडी घेत ‘गॅस कनेक्शन बंद होईल’ या भीतीचा गैरफायदा घेत एपीके फाईल्स पाठवण्यास सुरुवात केली.

तुम्हाला गॅस कनेक्शन बंदचा संदेश आलाय? सावधान! 'त्या' बिलावर क्लिक अन् बँक खाते त्वरित रिकामे
मुंबई :
इराण-इस्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रातील घराघरांपर्यंत पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी गॅस टंचाईच्या विचारांनी नागरिक त्रस्त आहेत. याच संकटात आता सायबर भामट्यांनी उडी घेत ‘गॅस कनेक्शन बंद होईल’ या भीतीचा गैरफायदा घेत एपीके फाईल्स पाठवण्यास सुरुवात केली. अनेकांना गॅस बिल अपडेटच्या नावाखाली जाळ्यात ओढून बँक खाते रिकामे होत आहे. यामुळे गॅसमुळे चिंतेत असलेल्या नागरिकांच्या डोकेदुखीत भर पडताना दिसत आहे.
चिंचपोकळीच्या तरुणाच्या खात्यातून दोन मिनिटांत ८३,५०० रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वद सुरेश परब (वय २५) याला १३ मार्च रोजी दुपारी अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप मेसेज आला. “महानगर गॅसचे बिल अपडेट नाही, रात्री कनेक्शन कट होईल” असा इशारा देत भामट्यांनी त्यांना दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधायला भाग पाडले. स्वतःला एमजीएल अधिकारी सांगणाऱ्या आरोपीने विश्वास संपादन करत एपीके फाईल पाठवली. फाईल डाउनलोड करताच परब यांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवत आरोपींनी “फक्त १२ रुपये भरा” असा बहाणा करून एटीएमची माहिती आणि पिन मिळवला. पुढच्याच क्षणी खात्यातून ४९,५००, २४,००० आणि १०,००० असे एकूण ८३ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परब यांनी बँकेत धाव घेतली आणि सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवली. मात्र, तोपर्यंत भामटे पैसे गायब करून नॉट रिचेबल झाले. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास करत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथे राहणाऱ्या मुकेश पटेल (वय ५५) यांना या फसव्या मेसेजद्वारे एपीके फाईल पाठवून १४.७९ लाखांची फसवणूक केली. त्यांच्या व आईच्या तीन खात्यांवरून ही रक्कम परस्पर काढण्यात आली.
...म्हणून बसतो विश्वास
गॅस कंपनीचे नाव वापरून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून ग्राहकांना येणारे मेसेज एक्स-एमजीएलएलटीडी नावाने येतात. मात्र भामट्यांचे फसवे मेसेज, कॉल खासगी नंबरवरून येतात. भामटे स्वतःला गॅस कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवतात. पुरवठा खंडित झाला तर चूल कशी पेटणार? ही भीती हेरून भामटे त्यांचे जाळे पसरवित आहेत. अशातच, गॅस पुरवठा सुरू ठेवण्यासाठी कोणतीही पडताळणी न करता नागरिक फसव्या मेसेजमधील एपीके फाईल उघडतात, आपले तपशील भरतात.
...असे ओढतात जाळ्यात
एपीके फाईल पाठवून त्याद्वारे भामटे नागरिकांच्या मोबाईलचा परस्पर ताबा मिळवतात. ताबा मिळाला की ऑनलाइन बँकिंग तपशील, ओटीपीद्वारे नागरिकांच्या बँक खात्यावरील पैसे परस्पर इतरत्र वळवतात. फसवणुकीची हीच मुख्य पद्धत आहे. सुरुवातीला भामट्यांनी बोगस ई-चलनद्वारे नागरिकांने एपीके फाईल पाठवल्या. ज्यांनी त्या क्लिक केल्या, उघडल्या त्यांची फसवणूक झाली. त्यामुळे ‘कोणतीही लिंक क्लिक करू नका, एपीके फाईल्स डाउनलोड करू नका आणि बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका,’ असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संशय आला म्हणून टाळले; पण...
१. लालबाग परिसरात राहणारे प्रदीप वामन मैस्त्री (६१) यांना २१ फेब्रुवारी रोजी त्यांना ‘गॅस कनेक्शनचे बिल अपडेट नाही, कनेक्शन बंद होईल’ असा व्हॉट्सॲप मेसेज आला. त्यानुसार त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता स्वतःला ‘एमजीएल अधिकारी’ सांगणाऱ्या व्यक्तीने एपीके फाईल पाठवून ती इन्स्टॉल करण्यास सांगितले. मात्र, मैस्त्री यांनी संशय आल्याने त्यांनी ती फाईल उघडली नाही.
२. १६ मार्च रोजी सकाळी पुन्हा एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आल्यानंतर त्यांनी त्यांनी क्लिक केले. काही मिनिटांतच त्यांच्या बँक ऑफ इंडिया खात्यातून १४,७०० रुपये, २,९३९ रुपये आणि १,६११ रुपये असे सलग तीन व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले. अवघ्या काही क्षणांत एकूण १९,२५० रुपये खात्यातून वळते झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेत धाव घेतली. तसेच पोलिसातही तक्रार दिली. याप्रकरणी काळा चौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.