हार्बरची धाव बोरिवली पर्यंत होणार; गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश

By मनोहर कुंभेजकर | Published: April 22, 2024 07:34 PM2024-04-22T19:34:58+5:302024-04-22T19:35:32+5:30

पश्चिम रेल्वे वरील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या बोरिवली स्टेशन आता हार्बर रेल्वे द्वारे जोडले जाणार आहे.

Harbor run up to Borivali Gopal Shetty's follow-up success | हार्बरची धाव बोरिवली पर्यंत होणार; गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश

हार्बरची धाव बोरिवली पर्यंत होणार; गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: पश्चिम रेल्वे वरील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या बोरिवली स्टेशन आता हार्बर रेल्वे द्वारे जोडले जाणार आहे. गोरेगाव ते बोरिवली या हार्बर रेल्वे सेवा विस्तारीकरणाच्या कामाची निविदा मे महिन्यात सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.गोरेगाव ते बोरिवली मधील स्थानके हार्बर रेल्वे द्वारे जोडण्यासासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी २०१९ पासून पाठपुरावा केला होता. 

 तसेच बोरिवली ते विरार दरम्यान ५ वी  आणि ६ वी मार्गिकेच्या कामाची देखील माहिती खा. शेट्टी यांनी वेळोवेळी पश्चिम रेल्वे महाप्रबंधकांकडे पत्र लिहून त्याची माहिती मागवून घेतली होती. ही दोन्ही कामे युद्धपातळीवर करून सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. 

गोरेगाव ते बोरिवली स्थानका मधील मार्गात मालाड स्थानक एलिव्हेटेड करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  खा. शेट्टी यांना पश्चिम रेल्वे महाप्रबंधक अशोक कुमार मिश्र यांनी पत्र लिहून दोन्ही कामांची माहिती दिली होती. कांदिवली रेल्वे स्थानकाचे विकासकाम मुंबई रेल्वे विकास कॉर्प. लिमी. ( एमव्हीआर सी)  करत आहे. बोरिवली स्थानकाचा विकास रेल भूमी विकास प्राधिकरण (आरएलडीए) करणार असून सल्लागाराची निवड प्रक्रिया अद्याप व्हायची आहे. तसेच गोरेगाव ते बोरिवली हार्बर रेल्वे विस्तारीकरण , जिओटेक सर्वे, ड्रोन सर्वे, जागांवर शोधकाम सर्वे, झाडे-जमीन आदी सर्व पूर्ण झाले आहेत. जमीन संपादन प्रस्ताव, झाडे आदींचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. संरेखन प्रस्ताव, पूल आदींचे प्रस्ताव रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवले आहेत अशी माहिती खा. गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली.

सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान पूर्वी हार्बर सेवा उपलब्ध होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी अंधेरी स्थानकात उतरून मग पश्चिम रेल्वेद्वारे पुढील प्रवास करत होते. वाढती मागणी लक्षात घेता ही सेवा २०१९ मध्ये गोरेगाव पर्यंत वाढवण्यात आली.  हार्बरचा विस्तार करताना गोरेगाव ते मालाड आणि मालाड ते बोरिवली  अश्या २ टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा २०२६-२७ तर दुसरा टप्पा २०२७-२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे ८२५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जून महिन्याच्या आधी प्रत्यक्ष चे काम सुरु करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन असंल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Harbor run up to Borivali Gopal Shetty's follow-up success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.