Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीआधीच मिळणार महिन्याचा संपूर्ण पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:09 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारी नोकरदारांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे

मुंबई - देशभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गावापासून महानगरापर्यंत बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. खरेदीसाठी अनेक दुकानात रांगा पाहायला मिळत आहे. दिवाळीचा सण अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपल्याने सगळीकडे दिवाळीचा माहोल आहे. त्यामुळेच, दिवाळीसाठीचा मिळणार बोनस आणि पगार याची चर्चा नोकरदारांमध्ये होत आहे. अनेक ठिकाणी बोनस वाटप झाले असून पगारही दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय झाला आहे. आता, सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा केले जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारी नोकरदारांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. २२ ऑक्टोबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. त्यामुळे, राज्य सरकारच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार जो नोव्हेंबर महिन्यात केला जातो. मात्र, दिवाळी सणासाठी या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी या सर्वांचा ऑक्टोबर महिन्यातील पगार दिवाळीपूर्वीच केला जाणार आहे. त्यासाठीचा आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार आता या कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोबर रोजीच वेतन मिळणार आहे. त्यामुळे, सर्वांची दिवाळी गोड होणार आहे.  शासनाचा हा निर्णय सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना लागू असणार आहे. त्यामुळे, दिवाळीपूर्वीच यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईकर्मचारीदिवाळी 2022