हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार! शेलार यांचे आश्वासन; म्हणाले, "शिवसेनेने प्रभूंची अवहेलना केली.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:18 IST2025-12-03T13:17:52+5:302025-12-03T13:18:08+5:30
मुंबईचे माजी महापौर स्व. डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. विलेपार्लेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार! शेलार यांचे आश्वासन; म्हणाले, "शिवसेनेने प्रभूंची अवहेलना केली.."
शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनेसाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. विलेपार्लेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९८७च्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खारदांड्याच्या शंकर मंदिरात झालेल्या सभेत हिंदुत्वावर मते मागितल्याने १९९५ साली सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि डॉ. प्रभू यांचा सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क काढून घेतला. यानंतर डॉ. प्रभू यांचे नाव हिंदुत्वाशी जोडले गेले आणि ही निवडणूक देशभर चर्चेत आली. मात्र, नंतर शिवसेनेने त्यांची अवहेलना केली, अशी खंत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी काल रात्री पार्ल्यात व्यक्त केली.
डॉ. प्रभू यांची कन्या लीना प्रभू यांनी सुचविल्याप्रमाणे त्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून “प्रभू महिमा” हे पुस्तक राज्यातील प्रत्येक लायब्ररीत ठेवण्यासाठी आणि हनुमान रोड मेट्रो स्टेशनला त्यांचे नाव देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही शेलार यांनी दिले. डॉ. प्रभू यांच्या जीवनावर आधारित नाट्यरूप सादरीकरण सादर होणारे ते पहिलेच माजी महापौर असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
जुहू–विलेपार्ले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक स्व. डॉ. पुष्पा प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित “प्रभू महिमा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित राहून मंत्री शेलार यांनी डॉ. प्रभू यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले. प्रकाशनापूर्वी त्यांच्या कार्याची झलक दाखविणारे नाट्यरूप सादरीकरणही सादर केले गेले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार अँड. पराग अळवणी, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार-माजी मंत्री गजानन कीर्तिकर,माजी महापौर अँड. निर्मला सामंत प्रभावळकर,राजू रावळ, तसेच डॉ. प्रभू यांचे पूत्र अरविंद प्रभू, कन्या लीना प्रभू आणि साडेतीन तास मोठ्या संख्येने पार्लेकर उपस्थित होते.
लीना प्रभू यांच्या सूचनेवरून हे पुस्तक नवीन पिढीसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरावे, तसेच मेट्रो स्टेशनला त्यांच्या वडिलांचे नाव मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री शेलार यांनी पुनरुच्चारित केले.
आमदार अँड. पराग अळवणी म्हणाले की, डॉ. प्रभू यांचे जीवन आणि कार्य म्हणजे आमच्यासाठी एक सिलॅबस आहे. या पुस्तकातून त्यांचे व्यक्तिमत्व नव्या पिढीला समजून घेता येईल.” त्यांनी शिवसेना–भाजप युती घडविण्यात डॉ. प्रभू यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, तसेच बाळासाहेब ठाकरे आणि आरएसएसचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची भेट घडवून आणल्याचा किस्सा सांगितला. “हिंदुत्व ही जीवनशैली असून या लढ्यात डॉ. प्रभू यशस्वी झाले,” असेही त्यांनी नमूद केले.
गजानन कीर्तिकर यांनी डॉ. प्रभू यांच्या अनेक आठवणी जागवत, त्यांच्या स्मृती पुस्तकरूपाने चिरकाल टिकाव्यात, असे सांगितले आणि प्रभू कुटुंबाचे कौतुक केले.
अँड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले की, “डॉ. प्रभू हे राजकारणातील वेगळे, सुसंस्कृत राजकारणी होते. क्रीडा, पर्यावरण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य तसेच न्यायालयीन खटल्यातील त्यांची अढळ भूमिका मी जवळून पाहिली.
राजू रावळ यांनी १९८७ च्या पोटनिवडणुकीतील आठवणी सांगत, “हिंदुत्व एकसंघ राहावे ही त्यांची मनापासून इच्छा होती,” असे नमूद केले.
प्रास्ताविक करताना लीना प्रभू म्हणाल्या की, आई आणि बाबा यांच्या कार्याची प्रेरणादायी झलक नाट्यरूप सादरीकरणातून दाखवण्याची संकल्पना माझी आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये मी आणि भाऊ अरविंदने तयार केले आहे. त्यांच्या नावाने विलेपार्ल्यात एक वास्तू उभारण्यासाठी मंत्री शेलार आणि आमदार अळवणी यांनी सहकार्य करावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तपासे यांनी करत, हिंदुत्वासाठी राजकीय हुतात्मा स्वीकारलेल्या स्व. डॉ. रमेश प्रभू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले. तसेच, लीना प्रभू यांनी केलेल्या मागणी प्रमाणे मेट्रो स्टेशन, हॉस्पिटल, शाळा–कॉलेज यांना डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देण्याच्या आग्रहाला, तपासे आणि उपस्थित पार्लेकरांनी जोरदार पाठिंबा दिला.