Join us

"गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत"; गौसंवर्धनाच्या मुद्द्यावरुन भाजपचे संजय उपाध्याय आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:07 IST

Sanjay Upadhyay: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आणि विचारांवर काम करणाऱ्या महायुती सरकारने गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत, अशी उदिग्न ...

Sanjay Upadhyay: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आणि विचारांवर काम करणाऱ्या महायुती सरकारने गाय कापणाऱ्यांचे हात तोडले पाहिजेत, अशी उदिग्न भावना बोरीवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी व्यक्त केली. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गौतस्करांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राज्य मातेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.

संजय उपाध्याय यांनी गौतस्करांवर कडक कारवाईसाठी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. गौतस्करांविरोधात कठोर कारवाईची मागणी करताना ते आक्रमकपणे बोलत होते. "माझ्याकडे बेकायदेशीररित्या चालवल्या जाणाऱ्या कत्तलखान्यांची यादी आहे, मग सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ९ जून २०२५ रोजी बदलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत उपाध्याय म्हणाले की, महाराष्ट्राने गाईला राजमातेचा दर्जा दिला आहे. तरीही राज्यात गौतस्करीच्या घटना थांबत नाहीत, हे दुर्दैवी आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपी कैफ मन्सूर शेख याच्यावर एक-दोन नव्हे तर १२ गुन्हे नोंदवले गेले आहेत, तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई का झाली नाही," असा सवाल संजय उपाध्याय यांनी उपस्थित केल.

गौतस्करीचा मुद्दा उपस्थित करताना उपाध्याय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील घोषणेची आठवण करून दिली. तेंव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की गोहत्या व गोतस्करी प्रकरणांवर मकोका अंतर्गत कारवाई होईल. मग या प्रकरणात मकोका का लावण्यात आला नाही? तो किती दिवसांत लावला जाईल? असं उपाध्याय म्हणाले. 

या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गौतस्करांविरोधात कारवाई करण्याची तयारी दर्शवली आणि सांगितले की १,७२४ टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. तसेच २०२२ ते २०२५ या काळात २,८०० हून अधिक प्रकरणं नोंदवली गेली असून ४,६०० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गौसंवर्धनाच्या मुद्द्यावरुन आमदार संजय उपाध्याय यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. "जेव्हा राज्याने गाईला राजमातेचा दर्जा दिला आहे, अशा वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहेत, हे अत्यंत लज्जास्पद आहे. याचा अर्थ असा का घ्यायचा की गोहत्या व गोतस्करी करणाऱ्यांना कायद्याचा, सरकारचा किंवा प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही? अशा गुन्हेगारांवर कठोर आणि ठोस कारवाई झाली पाहिजे. माझ्या जवळ अशा गुन्हेगारांची यादी आहे, जे वारंवार असे गुन्हे करत आहेत, असेही संजय उपाध्याय यांनी सांगितले.

टॅग्स :विधानसभासंजय उपाध्येभाजपागोरक्षकांचा हिंसाचार