बोरीवली-ठाणे भुयारी मार्गासाठी प्रबोधनकार ग्रंथालयावर हाताेडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:36 IST2025-10-06T10:36:40+5:302025-10-06T10:36:48+5:30
३० हजार बहुमूल्य पुस्तकांचा ठेवा वाऱ्यावर पडण्याची शक्यता; अबालवृद्ध वाचकांमध्ये चिंता

बोरीवली-ठाणे भुयारी मार्गासाठी प्रबोधनकार ग्रंथालयावर हाताेडा?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली-ठाणे भुयारी मार्गाचे काम सुरू झाले असून, त्यामुळे बोरीवली-मागाठाणे येथे असलेल्या कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचा बळी जाणार का, असा प्रश्न उपनगरवासीयांना पडला आहे. गेल्या ४८ वर्षांपासून हे ग्रंथालय असून, ३० हजार बहुमूल्य पुस्तकांच्या ठेव्याचे काय होणार, याचीही चिंता वाचनप्रेमींना सतावत आहे.
दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार विजय वैद्य यांनी १ मे १९७७ रोजी बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्रनगर येथे मागाठाणे मित्र मंडळ स्थापन केले. त्याच्या माध्यमातून त्यांनी कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय उभारले. तसेच, मातोश्री रमाबाई केशव ठाकरे बालवाडी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळाही उभारण्यात आली.
या ग्रंथालयाला राज्य शासनाची मान्यता असून, ब वर्गाचा दर्जा प्राप्त आहे. वैद्य यांनी आपल्या सहकारी बांधवांबरोबर घरोघरी जाऊन दर्जेदार पुस्तके या ग्रंथालयासाठी प्राप्त केली. सुमारे ३० हजार पुस्तकांचा बहुमूल्य ठेवा या ग्रंथालयात उपलब्ध आहे.
अनेक मान्यवरांच्या भेटी
ग्रंथालयाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेकांनी भेट दिली आहे. साहित्यिक शिवाजीराव भोसले यांच्यासह असंख्य साहित्यिकांची मांदियाळी या वास्तूने पाहिली आहे.
एका बाजूला जम्मू-काश्मीरमध्ये पुस्तकांचे गाव उभे करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असताना, दुसरीकडे भुयारी मार्गासाठी या परंपरागत वाचनालयावर हातोडा पडणार असून, हे ४८ वर्षे जुने ग्रंथालय पाडून ते थेट चारकोप कांदिवली येथे स्थलांतरित करण्यात यावे, अशी नोटीस एमएमआरडीएने संचालकांना दिलीय.
आमच्या ग्रंथालयाचे वाचक बोरीवली पूर्वेकडील आहेत. चारकोपला एवढ्या लांब वाचक कसे जाणार? ग्रंथालय
इथून स्थलांतरित केले, तर अनुदानही बंद होईल. त्यामुळे मंडळाला ग्रंथालय चालवणे मुश्कील होईल. हजारो वाचकांचा विचार करून
सरकारने जय महाराष्ट्रनगर परिसरातच जागा द्यावी. - सुभाष देसाई, सल्लागार, मागाठाणे मित्र मंडळ
या परिसरातील हजारो आबालवृद्ध वाचक वाचनासाठी चारकोप कांदिवली येथे कसे जाणार? असा सवाल परिसरातील वाचक विचारत आहेत. या ग्रंथालयासह बालवाडी आणि व्यायामशाळेसाठी जय महाराष्ट्र नगर परिसरातच जागा उपलब्ध करून देण्याची मागणी मंडळाकडून केली जात आहे.