टेलिग्रामवर हॉल तिकीट, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा आदल्या रात्रीपर्यंत गोंधळ संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 10:37 IST2025-01-15T10:37:29+5:302025-01-15T10:37:51+5:30

या तिन्ही परीक्षांना ५,०८१ विद्यार्थी बसले आहेत. मात्र, यातील अनेक विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नव्हते.

Hall ticket on Telegram, confusion did not end till the night before Mumbai University exam | टेलिग्रामवर हॉल तिकीट, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा आदल्या रात्रीपर्यंत गोंधळ संपेना

टेलिग्रामवर हॉल तिकीट, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचा आदल्या रात्रीपर्यंत गोंधळ संपेना

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) परीक्षेत विद्यापीठाच्या गोंधळाचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. सीडीओईच्या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यापीठाकडून हॉल तिकीट दिले नाही. त्यातून विद्यार्थ्यांना यंदाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

विद्यापीठाच्या सीडीओईच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. यामध्ये विद्यापीठाकडून सकाळच्या सत्रात एमए आणि एमकॉम अभ्यासक्रमाच्या, तर दुपारच्या सत्रात एमएससीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांचे आयोजन केले होते. या तिन्ही परीक्षांना ५,०८१ विद्यार्थी बसले आहेत. मात्र, यातील अनेक विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नव्हते.

आम्ही तीन दिवस हॉल तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होतो. शेवटी विद्यापीठाने सोमवारी रात्री टेलिग्राम ग्रुपवर हॉल तिकीट दिले, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षा असल्याची सुद्धा माहिती नव्हती. त्यातून विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचल्यावर परीक्षेची तयारी करण्यात आली. 

अधिकारी राजकारण करण्यात मश्गुल
विद्यापीठाने किमान तीन दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाचे अधिकारी राजकारण करण्यात मश्गुल असल्याने विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे युवा सेनेचे नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाजात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अभाविपचा कोंकण प्रदेशमंत्री राहुल राजोरिया याने दिली.

विद्यार्थ्यांवर खापर
मुंबई विद्यापीठाने मात्र प्रवेशपत्र उशिरा देण्याचे खापर विद्यार्थ्यांवरच फोडत जबाबदारी झटकली आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत सुमारे ६८३ एवढ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे जमा केली नव्हती. वारंवार ही कागदपत्रे देण्याची सूचना देऊनही विद्यार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यातून त्यांचे प्रवेशपत्र तयार करण्यात अडचणी आल्या. परिणामी, व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोमवार संध्याकाळी उशिरा हॉल तिकिटे तयार केली, अशी माहिती विद्यापीठाच्या सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी दिली. 

Web Title: Hall ticket on Telegram, confusion did not end till the night before Mumbai University exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.